News Flash

टीएमटीच्या निम्म्या गाडय़ा बस आगारातच

ठाणे महापालिकेचे विरोधी पक्ष नेते संजय भोईर यांनी गुरुवारी टीएमटीच्या विविध आगारांना भेट दिली.

३२५ पैकी १७५ बस नादुरुस्त असल्याची माहिती

ठाणेकर प्रवाशांना दर्जेदार सेवा पुरविण्याचा दावा करणाऱ्या ठाणे परिवहन उपक्रमातील ३२५ बसगाडय़ांपैकी तब्बल १७५ बसगाडय़ा पुरेशा देखभाल, दुरुस्तीअभावी नादुरुस्त अवस्थेत असल्याची माहिती पुढे आली आहे. परिवहन व्यवस्थेचा केंद्रबिंदू असणाऱ्या एकटय़ा वागळे इस्टेट येथील आगारात १३२ बसगाडय़ा बंद अवस्थेत उभ्या असून वातानुकूलित सेवेचा गाजावाजा करत ताफ्यात दाखल झालेल्या सहा व्हॉल्वो बसगाडय़ाही नव्या काचांचा खर्च परवडत नसल्याने आगारा बाहेर काढल्या जात नाहीत, असे विश्वसनीय वृत्त आहे.

ठाणे महापालिकेचे विरोधी पक्ष नेते संजय भोईर यांनी गुरुवारी टीएमटीच्या विविध आगारांना भेट दिली. त्या वेळी ही धक्कादायक माहिती पुढे आली. वागळे आगारामधील २४४ पैकी १३२ बसगाडय़ा सुट्टय़ा भाग उपलब्ध होत नसल्याने नादुरुस्त अवस्थेत उभ्या आहेत. या आगारातून दररोज जेमतेम ११२ बस विविध मार्गावर धावत आहेत. नादुरुस्त बसगाडय़ांपैकी  निम्म्याहून अधिक बस गेली पाच ते सात वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आगारात धूळ खात उभ्या आहेत. प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळावी यासाठी महापालिकेकडून काही कोटी रुपयांचा निधी परिवहन उपक्रमाकडे वर्ग करण्यात येतो. या निधीच्या विनियोगाविषयी या निमित्ताने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात सुमारे तीनशेहून अधिक बसगाडय़ा आहेत. त्यापैकी वागळे आगारात सुमारे २४४ तर कळवा आगारात सुमारे ८० बसगाडय़ा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नव्या बस खरेदीचा प्रस्ताव असल्याने आणखी आगारांची निर्मिती केली जात आहे.

असे असले तरी उपलब्ध असलेल्या दोन्ही आगारांमधून दिवसाला जेमतेम दीडशेच्या आसपास बसगाडय़ा बाहेर पडत असल्याची परिस्थिती आहे.

वागळे आगारातील बसची आकडेवारी..

बस मॉडेल (वर्ष)                           एकूण   चालू     बंद

२००१                                                  १           ०        १

२००३                                                 १९         ३      १६

२००५                                                  १२        २       १०

२००५ (सीएनजी)                                २५      १      २४

२००९ (सीएनजी)                                 १४     ३     ११

२००९                                                   २३     २१    ०२

२०१० (जेएनएनयुआरएम)              २०     १०    १०

२०१० (सीएनजी)                              ८०     ४५     ३५

२०१० (मार्कोपोलो-नॉन एसी)         ३०     १३     १७

२०१० (मार्कोपोलो- एसी)                   १०    ४      ६

२०१४ (मिडी बसगाडय़ा)                   १०    १०     ०

एकूण                                             २४४    ११२    १३२

 

टीएमटीची दुखणी

*वागळे आगारामध्ये अनेक बसगाडय़ा चाके उपलब्ध नसल्यामुळे उभ्या आहेत. या बसगाडय़ा रस्त्यावर उतरण्यासाठी सुमारे ४०० चाकांची गरज आहे.

*बसगाडय़ांचे इंजीन उतरविण्यासाठी पुलीची व्यवस्था नाही.

*अनेक बसगाडय़ा सुट्टय़ा भागाअभावी उभ्या आहेत.

*बसगाडय़ाचा तुटलेला पत्रा जोडण्यासाठी रॅबिट उपलब्ध नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 2:45 am

Web Title: half of the tmt buses in bus depot
Next Stories
1 निवडणुका झाल्या.. आता निधी द्या!
2 भंगार रिक्षाचालकांना परिवहन विभागाचा ‘दे धक्का’
3 बदलापूरमध्ये मासळी विक्रेत्यांचे अवैध गाळे जमीनदोस्त
Just Now!
X