वेळेवर पोहोचण्यासाठी दोन-अडीच तास आधी घरातून प्रस्थान

ठाणे : वडाळा-कासारवडवली मेट्रो आणि मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे विणण्यासाठी एमएमआरडीए आणि महापालिकेतर्फे एकाच वेळी सुरू असलेल्या कामांमुळे घोडबंदर महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी नित्याची बाब बनली आहे. मात्र, गुरुवारपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षार्थीना या कोंडीचा मोठा फटका बसू लागला असून ठाण्यातील विविध भागांतील परीक्षा केंद्र गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना सुमारे दोन ते अडीच तास आधी घरातून बाहेर पडावे लागत आहे.

एरवी घोडबंदर ते जुने ठाणे हा प्रवास काही मिनिटांचा असला तरी कोंडीच्या भीतीने विद्यार्थी काही तास आधीच केंद्रांवर येऊन ठिय्या मांडत आहेत. विशेष म्हणजे, ठाणे वाहतूक पोलिसांनीही या कोंडीचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये यासाठी जागोजागी तैनात करण्यात आलेले वाहतूक सेवक आणि वॉडर्न यांना वेळ आल्यास स्वतच्या दुचाकीने परीक्षा केंद्रांवर सोडावे, अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत.

घोडबंदर मार्गावर वाहन कोंडी होऊ नये यासाठी महापालिकेने काही वर्षांपूर्वी या मार्गास लागूनच सेवा रस्ते तयार केले आहेत. मात्र, शहरातील मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे सक्षम करण्यासाठी महापालिकेने हे सेवा रस्तेही खोदले आहेत. त्यामुळे मूळ मार्गावर मेट्रोची कामे आणि सेवा रस्त्यांवर मलनिस्सारण वाहिन्यांचे खोदकाम अशा दुहेरी कोंडीत प्रवासी अडकत आहेत. विद्यार्थ्यांनी खबरदारी म्हणून घरातूनच लवकर निघण्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांना सूचना

वाहतूक कोंडीत अडकून परीक्षेला विलंब होऊ नये, यासाठी विद्यार्थी खबरदारी घेत असले तरी, वाहतूक पोलीसही मदतीला धावून गेले आहेत. या कोंडीत विद्यार्थ्यांनी अडकू नये म्हणून आपल्या वाहतूक सेवक आणि कामावर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मदत करावी, अशा सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. वेळ आल्यास वाहतूक सेवकांशी संपर्क साधावा, असे आवाहन कासारवडवली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी केले.

अपघातामुळे परीक्षा हुकली

नवी मुंबईहून ठाण्यात आयटीआयची परीक्षा देण्यासाठी निघालेला एक विद्यार्थी खासगी बसच्या धडकेत जखमी झाल्याने त्याला परीक्षेला मुकावे लागले. ठाणे येथील तीन हात नाका परिसरात गुरुवारी ही दुर्दैवी घटना घडली.

नवी मुंबई येथील संजय गांधीनगर परिसरात रोहित चंदणशिवे (१९) हा कुटुंबासह राहतो. गुरुवारी त्याचा आयटीआयच्या परीक्षेचा पहिला पेपर होता. त्यासाठी ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयामधील परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी तो तीन हात नाका सिग्नल ओलांडत होता. त्याचवेळेस एका खासगी बसने त्याला धडक दिली. या धडकेत खाली पडमून त्याच्या डोक्याला मार लागला. पोलिसांनी त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र या अपघातामुळे त्याचा पेपर हुकला असून त्याला आता सहा महिन्यांनंतर हा पेपर द्यावा लागणार आहे. त्यामुळे त्याचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. या अपघाताप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बसचालकाचा शोध सुरू आहे, अशी माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे यांनी दिली.

विद्यार्थ्यांची खबरदारी

’ घोडबंदर येथील आझादनगर भागात राहणारा संदीप दिवेकर याला बारावीसाठी श्रीरंग विद्यालय हे परीक्षा केंद्र आले आहे. हा भाग आझादनगरपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. मात्र, घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीचा विचार करून संदीप सकाळी ११च्या परीक्षेसाठी

नऊ वाजताच घरातून बाहेर पडतो.

’ मानपाडा भागात राहणाऱ्या कार्तिक गावंड याला ठाण्यातील एका शाळेत केंद्र मिळाले आहे. ‘घोडबंदर मार्गावरील कोंडीमुळे या ठिकाणी टीएमटी अथवा खासगी बस वेळेवर येत नाहीत. त्यामुळे मी ९ वाजता घरातून बाहेर पडतो आणि परीक्षा केंद्रावर जाऊन शेवटची उजळणी करतो,’ असे कार्तिकने सांगितले.

’ कासारवडवली येथे राहणारा संतोष भोईर हा सकाळी ८.४५ वाजता बाहेर पडतो. ‘गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक कोंडी झालेली नाही. मात्र, अचानक केव्हाही वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यामुळे मी माझा अभ्यास रात्रीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पेपर सकाळी ११ वाजताचा असला तरी लवकर घर सोडलेले बरे,’ असे त्याचे म्हणणे आहे.