दोन महिन्यांत १३ हजार चालकांकडून ३२ लाखांची दंडवसुली, नऊ मद्यपी चालक तुरुंगात

राज्यात वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी ई चलन पद्धत सुरू केल्यानंतर मीरा भाईंदर शहरात अवघ्या दोन महिन्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १३ हजाराहून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे तसेच ९ मद्यपी वाहनचालकांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे.

वाहतूक पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईत पारदर्शकता यावी यासाठी राज्यात ई चलन पद्धत सुरू करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्य़ात या सेवेची सुरुवात मीरा भाईंदरमध्ये करण्यात आली. त्यानंतर १ जून ते ३१ जुलै दरम्यान वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या नेतृत्वाखालील वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणारे १३ हजार १९३ गुन्हे नोंदवले आहेत.

यात सर्वाधिक कारवाई हेल्मेट न घालणाऱ्या १२१६ वाहनचालकांवर, चारचाकी चालवताना सीट बेल्ट न लावणाऱ्या ८३३ आणि मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ३३ वहानचालकांवर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याआधी मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांना दंडाव्यतिरिक्त शिक्षा झाल्याची प्रकरणे फारशी ऐकिवात नव्हती, मात्र मीरा भाईंदरमध्ये कारवाई झालेल्या ९ मद्यपी वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. याव्यतिरिक्त सिग्नल तोडणे, अवैध वाहतूक, अती वेगाने वाहन चालविणे, चुकीच्या पद्धतीने मार्गिका बदलणे, बेदरकारपणे वाहन चालविणे आदी कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी दिली.

ई चलन पद्धतीत वाहतूक पोलिसांना अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रे देण्यात आली असून त्याद्वारे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना तात्काळ चलन बजावणे शक्य होत आहे. तसेच दंडाची रक्कम रोखीने तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्डने देखील घेण्याची या यंत्रात सुविधा असून त्याच्या पावतीची देखील तात्काळ प्रिंट काढून देण्याची सोय आहे.