किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : करोना प्रादुर्भावाच्या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या ठाण्यातील वागळे इस्टेट येथील उद्योजकांकडून कथित माथाडी कामगार आणि राजकीय पक्षांच्या कामगार संघटनांच्या नावाखाली खंडणीवसुली आणि धमक्यासत्र सुरू झाले आहे. या संदर्भात गेल्या तीन महिन्यांत वागळे इस्टेट औद्योगिक क्षेत्रातील १० उद्योजकांनी त्यांच्या तक्रारी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशनकडे (टिसा) दिल्या आहे. या प्रकारामुळे उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

करोना प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्वच उद्योग क्षेत्र आर्थिक संकटात सापडले आहे. ठाण्यातील वागळे इस्टेटमध्येही सुमारे एक हजार विविध छोटे-मोठे उद्योग आहेत. टाळेबंदीला टप्प्याटप्प्याने शिथिलता मिळाल्यानंतर आता वागळे इस्टेट येथील उद्योग सुरू झाले आहेत. मात्र या उद्योजकांना आर्थिक संकटानंतर खंडणीखोरीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कथित माथाडी कामगार राजकीय पक्षांच्या नावाखाली उद्योजकांना धमकावत तसेच त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. एखाद्या कारखान्यात मालवाहू वाहन आल्यानंतर हे कथित माथाडी कामगार उद्योजकाकडे जातात आणि त्यानंतर त्यांना आम्हीच सामान उतरविणार असल्याचे सांगतात. मात्र, या कथित माथाडी कामगारांकडे राज्य शासनाकडून दिला जाणारा अधिकृत नोंदणी क्रमांकही नसतो. एखाद्या वेळी घाबरून उद्योजकाने त्यांना मालवाहू वाहनातील वस्तू उतरविण्याची परवानगी दिली तर हे कथित माथाडी कामगार त्या वस्तू उतरविण्याऐवजी खंडणीची मागणी करतात. अशा प्रकारच्या १० तक्रारी गेल्या तीन महिन्यांत ‘टिसा’कडे आल्या आहेत. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच टिसा संघटनेने माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्यासोबतही झूम मीटिंगद्वारे संवाद साधून त्यांना याबाबत माहिती दिली. त्यांनीही खंडणीचे प्रकार करणारे हे माथाडी कामगार नसल्याचे सांगितले, तर दोनच दिवसांपूर्वी टिसाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचीही भेट घेऊन त्यांनाही याबाबत माहिती दिली आहे.

खंडणी अशी उकळली जाते..

वागळे इस्टेट औद्योगिक क्षेत्र असल्याने या ठिकाणी कारखान्यात बाहेरून येणारा कच्चा माल आणि विविध वस्तूंची ने-आण केली जाते. यासाठी या वस्तूंची वाहनातून कारखान्यापर्यंत ने-आण करण्यासाठी अधिकृत माथाडी कामगार नेमलेले असतात, तर काही वस्तू या यंत्राद्वारेच ठेवल्या जातात. त्या ठिकाणी माथाडी कामगारांची गरज भासत नाही. मात्र, काही जण राजकीय पक्षांच्या नावाखाली वागळे इस्टेटमध्ये येणारी अवजड वाहने अडवू लागले आहेत. या वस्तू ठेवण्याचे काम आम्हालाच द्या, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे. एखाद्या उद्योजकाने त्यांना काम करण्यास परवानगी दिली तर हे कथित माथाडी कामगार आम्ही काम करणार नाहीत, असे सांगतात. तसेच कामगारांना मारण्याची धमकी देऊन त्या बदल्यात १० ते २० हजार रुपयांची मागणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी एका उद्योजकाकडून ४५ हजार रुपयांची मागणी केली आणि त्यानंतर ७ हजार रुपये उकळण्यात आले. या संदर्भात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात एक तक्रार करण्यात आली आहे.

औद्योगिक क्षेत्रात माथाडी कामगारांकडून खंडणीचे प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. त्यासंदर्भात उद्योजकांशी चर्चा सुरू आहे. जर असे बेकायदा कृत्य होत असेल तर पोलिसांकडून तात्काळ कारवाई करण्यात येईल.

– डॉ. विनयकुमार राठोड, उपायुक्त, वागळे परिमंडळ