आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी ‘बायफ’चा पुढाकार

भातलावणीची कामे उरकली की आदिवासींची भटकंती सुरू होते ती पोटाची खळगी भरल्यानंतर रोजगार मिळविण्यासाठी कामाच्या शोधात इतरत्र स्थलांतरित होत असतात. पण या गोष्टीला अपवाद आहे जव्हार तालुक्यातील वनवासी हे गाव. ज्या वनवासी गावात एकेकाळी आपल्या घरातील मुलगी देण्यास तयार नसे त्या गावाला बायफ  संस्थेच्या मदतीमुळे गावात समृद्धी येईन ‘कलम बनविणारे गाव’ असे ओळखले जाऊ  लागले आहे.

पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील आदिवासी बांधव हे आपले जव्हारपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात गरिबी होती. भातशेतीची काम उरकल्यानंतर इतर गावातील लोकांप्रमाणे या गावातील रहिवासी नोकरीच्या शोधात स्थलांतरित व्हायची. घरची गरिबी त्यामुळे कुपोषण व आरोग्याच्या इतर समस्यांचा डोंगर उभा असे. वर्षांतील ६ ते ८ महिने कामाच्या शोधात फिरतीवर काढले की, पुन्हा पाऊस सुरू झाला की गावी परतायचे हा त्यांचा नित्यकम.

१९९३ साली जव्हार या तालुक्यामध्ये बायफ संस्था सुरू करण्यात आली. संस्थेने अनेक गावांतील मोजक्या शेतकऱ्यांची निवड करून त्यांना आंबा व काजू या झाडाची कलमे देण्याचे काम केले. साधारणपणे १९९७ साली बायफ या संस्थेकडून जव्हार तालुक्यातील वनवासी या गावाची निवड करण्यात आली. तेव्हा या गावातील काशिनाथ गावित व मोहन किरकिरा या दोन शेतकऱ्यांना आंब्याची २०, काजूची ३० तर पेरूची १० अशी कलमे दिली. या कलमांचे संवर्धन करण्यासाठी संस्थेने वर्षांला ८०० रुपयेही दिले.

त्यानंतर १९९८ साली संस्थेने त्यांना १२८ बंगलोरी मोगऱ्याची रोपे शेती करण्यासाठी दिली. मोगरा लागवड करून त्यातून मोगऱ्याची शेती फुलवली व सात महिन्यांत या शेतकऱ्यांना यातून दिवसाला एक किलोपर्यंत मोगऱ्याचे उत्पादन मिळायला सुरुवात झाली. या फुलांची विक्री तालुक्याच्या ठिकाणी करून त्यांना प्रति किलो ४० ते ५० रुपये एवढा बाजार भाव मिळाला.

२००४ साली संस्थेने मोगरा व आंबा या रोपांचे कलमे तयार करण्याचे प्रशिक्षण या दोन शेतकऱ्यांना दिले. प्रशिक्षण घेतल्यानंतर २००५ या सालापासून त्यांनी स्वत:ची कलमे स्वत: बनवायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी जवळपास मोगरा व आंबा या झाडांची साधारणपणे साडेतीनशे कलमे तयार करून जवळच्या बाजारपेठेमध्ये त्यांची विक्री केली. त्यांना यातून मोगरा कलमाला ३ रुपये व आंब्याच्या कलमासाठी १७ रुपये एवढा भाव मिळाला. कलम विक्रीतून मिळणारा आर्थिक नफा व बाजारातील कलमांची वाढती मागणी पाहता हे शेतकरी अधिक जोमाने कामाला लागले. गावातील इतर लोकांनी हे सगळे चित्र पाहिले असता इतर लोक या शेतीकडे हळूहळू वळायला सुरुवात झाली. मोगरा व आंबा यांच्या कलम शेतीतून मिळणारा आर्थिक नफा पाहता साधारणपणे २०१० ते २०११ या कालावधीमध्ये वनवासी हे गाव पूर्णपणे या शेतीकडे वळाले. हंगामाच्या वेळी वनवासी या गावातून दादर मार्केटला रोज २०० किलो मोगरा जातो. यातून चांगला आर्थिक नफा मिळत असल्याने गावातील प्रत्येक शेतकरी आज आंबा व मोगरा यांची कलमे तयार करताना दिसतात.

वर्षांपोटी या गावात जवळपास आंब्याची दोन ते अडीच लाख कलमे तयार करून त्यांची विक्री केली जाते. या कलमाची किंमत प्रति कलम २७ रुपये एवढी मिळते. तसेच  मोगऱ्याची पाच ते सहा लाख कलमे तयार करून त्यांची विक्री केली जाते. या कलमाची किंमत प्रति कलम सात रुपये एवढी मिळते. हे शेतकरी प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला बैठक घेऊ न त्यात अडचणींचा शोध घेतात व त्यावर उपाय शोधतात.

आर्थिक स्तर उंचावला

या कलमांना पुणे, बारामती, औरंगाबाद, संगमनेर, जालना, अकोला, नाशिक व कर्जत या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात मागणी असते. याशिवाय गावात केळी, पपई, काजू, चिकू, काळीमिरी यांसारख्या पिकांचे उत्पादनदेखील घेतले जाते. त्यातून वर्षांपोटी या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा नफा मिळतो. गावात ७३ कुटुंब राहात असून या कलम शेतीतून गावातील लोकांचा आर्थिक स्तर चांगला उंचावला आहे.

आदिवासी बांधव लोकांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबावे या उद्देशाने जिल्ह्यातील साधारणपणे सोळा हजार कुटुंबांना कलम तयार करण्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन केले आहे. पालघर जिल्ह्यतील एकही आदिवासी बांधव रोजगारासाठी बाहेर जाणार नाही यासाठी आम्ही सदैव तत्पर आहे.

– सुधीर वागळे (अतिरिक्त मुख्य कार्यक्रम समन्वयक -बायफ)

मोगरा व आंबा यांच्या कलम शेतीतून आम्हाला वर्षांपोटी साधारण आठ ते नऊ  लाखांचे उत्पादन मिळते. आज आमची मुले चांगल्या शाळेत शिकत आहेत.

– नितीन चौधरी, शेतकरी

मोगरा व आंबा यांच्या कलम शेतीतून मी साधारणपणे वर्षांला मोगऱ्याची दीड लाख कलमे व आंब्याची ३० ते ४० हजार कलमे तयार करतो. त्यातून मला वर्षांला १३ लाख उत्पन्न मिळते.

-काशीनाथ गावित, शेतकरी