कल्याण-डोंबिवली महापालिकेत ठरावाला मंजुरी

कल्याण : मुंबई तसेच नवी मुंबई परिसरातील गृहनिर्माण वसाहतींमध्ये नगरसेवक तसेच महापालिका निधीतून केल्या जाणाऱ्या विकासकामांना राज्य सरकारची स्थगिती असताना कल्याण डोंबिवली महापालिकेने नगरसेवक निधीतून वसाहतींच्या आवारात कामे करण्याचा ठराव मंजूर केला आहे. मुंबई पालिका हद्दीत मुलुंड येथे नगरसेवक, आमदार निधीतून सोसायटय़ांच्या आवारात लाद्या, पेव्हर ब्लॉक बसविण्याची कामे झाली आहेत. नवी मुंबईतही यापूर्वी मोठय़ा प्रमाणावर अशी कामे करण्यात आली आहेत. या धर्तीवर हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. मात्र, यामुळे निवडणुकीत विद्यमान नगरसेवकाला आणि त्याच्या पक्षाला मतांचा फायदा होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

खासगी वसाहतींमध्ये महापालिकेच्या माध्यमातून विकासकामे केली जावीत ही राज्यातील जवळपास सर्वच शहरांमधील नगरसेवकांची मागणी आहे. काही वर्षांपूर्वी नवी मुंबई महापालिकेने यास्वरूपाची कामे सुरू केली. सिडकोने बांधलेल्या वसाहतींमध्ये लाद्या, पेव्हर ब्लॉक बसविणे यांसारखी कामे केल्यानंतर राज्याच्या महालेखापरीक्षकांनी या कामांवर झालेल्या खर्चावर आक्षेप नोंदविला होता. वसाहतींमधील जागा तेथील रहिवाशी संघटनांच्या अखत्यारीत येत असल्याने अशी कामे करण्याचा महापालिकेचा अधिकारी नाही असा आक्षेप आल्याने महापालिकेने ही कामे बंद केली होती. पुढे या वसाहतींमधील जलवाहिन्या आणि मलवाहिन्या बदलण्यापुरती ही कामे हाती घेतली जात. मुंबई महापालिका हद्दीत अशा स्वरूपाची काही कामे यापूर्वी करण्यात आली असली तरी राज्य सरकारची या कामांना अजूनही मंजुरी नाही. या पाश्र्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेने वसाहतींमधील कामे नगरसेवक निधीतून केली जावीत अशा स्वरूपाचा ठराव मंजूर करत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

कल्याण डोंबिवली शहरांचे भौगोलिक क्षेत्र उंचसखल आहे. सोसायटींच्या परिसरात उंचसखलपणा असतो. प्रत्येक सोसायटीला लाद्या, पेव्हर ब्लॉकचा खर्च परवडत नाही. अशी मंडळी नगरसेवकांकडे ही कामे करून मागतात. शेवटी हे रहिवासी पालिकेचे करदाते आहेत. त्यामुळे नगरसेवक निधीतून सोसायटय़ांच्या आवारात सुविधांची कामे केली तर त्यात गैर काय आहे, असा सवाल यावेळी काही नगरसेवकांनी उपस्थित केला. मुलुंड येथे नगरसेवकाच्या निधीतून सोसायटय़ांच्या आवारात अनेक कामे केली गेली आहेत. मग कल्याण डोंबिवली पालिकेलाच का वावडे, असे प्रश्न करीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी यासंबंधीचा ठराव मंजूर केला.

महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांनी मात्र या कामांना मंजुरी देणे कठीण आहे, असे स्पष्ट केले. ‘पालिकेचा निधी हा खासगी जागेवर वापरता येणार नाही. रस्ता सार्वजनिक वहिवाटीचा असेल तर तेथे पालिकेने सुविधा द्यावी. पण सोसायटी परिसर खासगी लोकांचा असतो. तेथे पालिकेचा निधी खर्च करणे योग्य नाही,’ असे ते म्हणाले.