05 March 2021

News Flash

दिव्यातील तलावाची दुरवस्था कायम

संरक्षक भिंतीची पडझड, पाण्यात कचऱ्याचा खच

दिवा रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या तलावाची गेल्या काही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली असून हा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे.

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : दिवा रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या तलावाची गेल्या काही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली असून हा तलाव प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. काही महिन्यांपूर्वी या तलावाची संरक्षक भिंत कोसळली असून त्याचबरोबर या तलावात सर्रासपणे कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे तलावाच्या पाण्यात कचऱ्याचे ढीग जमा झाले असून तलावाचे पाणीही दूषित झाले आहे. या दूषित पाण्याला दरुगधीही येऊ लागली असून त्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहरात काही वर्षांपूर्वी ७० हून अधिक तलाव होते. सध्या शहरात केवळ ३३ तलाव अस्तित्वात आहेत. या तलावांचे अस्तित्व टिकविण्यासाठी महापालिका गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तलाव परिसरात सुशोभीकरणाचे उपक्रम राबवीत असून त्यासाठी कोटय़वधी रुपयांचा खर्च केला जात आहे. मात्र, त्यामध्ये शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या काही मोजक्याच तलावांच्या परिसरात हा उपक्रम राबविला जात असून इतर तलावांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शहरातील नागरिकांकडून होत आहे. दिवा भागातील रेल्वे स्थानक परिसरात तलाव आहे. मात्र, या तलावाच्या देखभाल दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असून यामुळे या तलावाचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या काही महिन्यांपासून या तलावाची संरक्षक भिंत तलावातच पडली आहे. याच भागात दिवा शहराची मुख्य बाजारपेठ आणि रिक्षा थांबा आहे. तुटलेल्या संरक्षक भिंतीचा फायदा घेऊन येथील दुकानदार, विक्रेते आणि थांब्यावर उभे राहणारे प्रवासी कचरा तलावात फेकत आहेत. त्यामुळे या तलावात आता कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. कचऱ्यामुळे तलावाच्या पाण्यालाही दरुगधी येऊ लागली आहे. तलावाचे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण झाले आहे. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप दिव्यातील स्थानिक नागरिकांकडून होत आहे. एकीकडे दिव्यात तीव्र पाणीटंचाई असून नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते आहे. हा तलाव स्वच्छ केल्यास त्याचे पाणी नागरिकांना इतर वापरासाठी उपलब्ध होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया ‘जागा हो दिवेकर’ संस्थेचे अध्यक्ष विजय भोईर यांनी दिली.

दिवा रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या तलाव सुशोभीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले होते. मात्र, करोनामुळे हे काम लांबले आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून सुरुवातीला या तलावाचा गाळ काढला जाणार आहे. त्यानंतर या तलावाला कुंपण बांधले जाणार आहे.
– मनीषा प्रधान, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, ठाणे महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2020 3:01 am

Web Title: lake at diva is in bad condition dd70
Next Stories
1 नव्या उड्डाणपुलात मेट्रो, रेल्वेचा अडसर
2 पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा
3 हल्ल्याप्रकरणी उल्हासनगर पालिकेतील लिपिकाला अटक
Just Now!
X