कळवा रुग्णालयातील एमआरआय, सीटी स्कॅन सेवेची अद्याप प्रतीक्षा; तांत्रिक तपासण्यांपूर्वीच महापालिकेकडून लोकार्पण सोहळा

ऋषीकेश मुळे, ठाणे कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एमआरआय आणि सीटी स्कॅन यंत्रणेच्या लोकार्पणाचा सोहळा पार पडून पाच दिवस लोटल्यानंतरही ही यंत्रणा रुग्णांच्या सेवेसाठी कार्यान्वित झालेली नाही. अशा प्रकारची यंत्रणा सुरू करण्यापूर्वी त्याची तांत्रिक चाचणी करणे आवश्यक असते. मात्र, ही चाचणी न करताच पालिकेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत लोकार्पणाचा सोहळा राबवला. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता गृहीत धरून हा शुभारंभाचा थाट आधीच उरकून घेण्यात आल्याचे आता उघड होत आहे. मात्र, रुग्णांना अजूनही या तपासण्यांसाठी खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत आहे.

ठाणे तसेच आसपासच्या शहरांतील गरीब रुग्णांच्या उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विविध सुविधा पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गत गरिबांना एमआरआय आणि सिटी स्कॅन या सुविधा मोफत तसेच अत्यल्प दरात पुरवण्यासाठी यंत्रणा खरेदी करण्यात आली. गेल्या आठवडय़ात गुरुवारी या उद्घाटनचा भव्यदिव्य कार्यक्रम रुग्णालयाच्या प्रांगणात पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेचे आमदार, खासदार आणि ठाणे शहराचे आयुक्त हे उपस्थित होते. आयुक्तांनी एमआरआय आणि सिटी स्कॅन सुविधा सुरू करून स्तुत्य कार्य केले आहे, अशा शब्दांत आयुक्तांचे उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. मात्र उद्घाटनानंतर पाच दिवस उलटून गेले तरी सुविधा सुरू करण्यात आलेली नाही.

रुग्णालयातील तळमजल्यावर एमआरआय आणि सिटी स्कॅन सुविधेसाठी विशेष विभाग उभारण्यात आला आहे. मात्र या विभागातील यंत्रणा अद्याप बंद अवस्थेत आहेत. विविध तांत्रिक बाबींमुळे ही यंत्रणा सुरू करण्यात आली नसल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.

विकरण विज्ञानकाची नियुक्ती झालेली नसून या यंत्रांच्या तांत्रिक तपासण्याही बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. जेजे रुग्णालय, नायर रुग्णालय, केईएम रुग्णालय, सायन रुग्णालय येथील एमआरआय आणि सिटी स्कॅन विभागाचे विभागप्रमुख कळवा रुग्णालयात येऊन या नव्या यंत्रणांची पाहणी करणार आहेत. त्यांच्या अहवालानंतरच ही सुविधा प्रत्यक्ष सुरू होईल, असे सांगण्यात आले.

यंत्रणा कार्यान्वित होऊ शकत नसताना तिच्या लोकार्पणाचा समारंभ का आयोजित करण्यात आला, असा सवाल आता येथे येणारे गरीब रुग्ण व त्यांचे नातलग विचारत आहेत. कोकण पदवीधर

मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता गृहीत धरून त्याआधी या यंत्रणेचे उद्घाटन उरकून घेण्यात आले, अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

 

आणखी पंधरा दिवस प्रतीक्षा

नायर रुग्णालयात काही महिन्यांपूर्वी एमआरआय मशीनमध्ये अडकून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे कळवा रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या एमआरआय आणि सिटी स्कॅन या यंत्रणाही दोषविरहित असण्याची खातरजमा करण्यासाठी त्याचा अगोदर व्यवस्थित अभ्यास आम्ही करणार आहोत, अशी माहिती कळवा रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संध्या खडसे यांनी दिली. यासंबंधी एक अहवाल तयार करून यंत्रणांशी संबंधित तज्ज्ञांकडून त्याची खातरजमा केल्यानंतर सुविधा सुरू करण्यात येणार आहे. सुविधा सुरू होण्यासाठी अजून दहा ते पंधरा दिवस रुग्णांना वाट पाहावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.