प्राचीन भारताचा इतिहास, विज्ञान, भाषा, साहित्य, कला यांचे महत्त्व सर्वाना कळण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील असले पाहिजे, असे मत पुण्यातील डेक्कन महाविद्यालयाचे डॉ. वसंत शिंदे यांनी व्यक्त केले. ‘प्राचीन विज्ञान आणि पुरातत्त्व सोसायटी ऑफ इंडिया’तर्फे आठवी वार्षिक राष्ट्रीय परिषद नुकतीच कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
सेन्च्युरी रेयॉन व आय.सी.एस.एस.आर यांनी संयुक्तपणे प्रायोजित केलेल्या या परिषदेचे उद्घाटन डॉ. शिंदे यांच्या हस्ते झाले. या परिषदेत प्रख्यात न्यूरोसर्जन आणि प्राचीन विज्ञानाचे गाढे अभ्यासक डॉ. राजा रेड्डी यांनी प्राचीन काळात माणसांना होणारे मेंदूचे आजार व त्यासंबंधी दिल्या जाणाऱ्या विविध उपायांची सविस्तर माहिती दिली. प्राचीन विज्ञान आणि पुरातत्त्व सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे अध्यक्ष डॉ. एम. डी. संपत आणि संयुक्त सचिव डॉ. पंकजा संपत यांनीदेखील परिषदेतील विद्यार्थी-शिक्षक, श्रोते यांना उद्देशून अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. या परिषदेत प्राचीन विज्ञान, गणित, साहित्य, भाषा, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, धातूशास्त्र अशा अनेक विषयांवर सुमारे साठपेक्षा अधिक शोधनिबंध सादर करण्यात आले. संपूर्ण देशभरातून विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांचे १४० हून अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्वप्ना समेळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील प्रा. सुवर्णा जाधव व प्रा. दीपक सूर्यवंशी यांनी परिषदेचे आयोजन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.