News Flash

नेतिवली टेकडी नवीन झोपडय़ांच्या विळख्यात

टेकडीचा माथा लुप्त होण्याची पर्यावरणप्रेमींना भीती

नेतिवली टेकडीला नवीन झोपडय़ांचा विळखा.

टेकडीचा माथा लुप्त होण्याची पर्यावरणप्रेमींना भीती

कल्याण : मजुरी, कामासाठी ये-जा करण्यासाठी नेतिवली टेकडी हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने मुंबई भागातील अनेक झोपडीपट्टीतील रहिवासी कायमचे निवास करण्यासाठी कल्याणमधील नेतिवली टेकडी भागात येत आहेत. नेतिवली टेकडीवरील अनेक रहिवासी आपल्या नातेवाईकांना सुखरूप राहण्याचे ठिकाण म्हणून टेकडी भागात राहण्यासाठी बोलवत आहेत. नवीन झोपडय़ांच्या बांधकामांमुळे येत्या काही महिन्यांत टेकडीचा माथा लुप्त करण्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.

टेकडीवर नवीन झोपडय़ा उभ्या राहिल्या की या भागात वीजमीटर, पाण्याची सुविधा, पथदिवे यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. नवीन झोपडय़ा उभ्या राहत असताना त्याला विरोध करण्याऐवजी किंवा प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांकडून जमीनदोस्त करून घेण्याऐवजी लोकप्रतिनिधी यांकडे डोळेझाक करतात, अशा तक्रारी आहेत. यापूर्वी तीन ते चार हजार लोकसंख्या असलेला नेतिवली टेकडीचा भाग आठ ते १० हजार लोकसंख्येचा झाला आहे. या भागात पालिकेचा निवडणुकीसाठी नवीन प्रभाग निर्माण होऊ शकतो. या दृष्टीने टेकडी भागातील काही तथाकथित पुढारी झोपडय़ांची वाढीव बांधकामे होण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

नेतिवली टेकडीवर विभागाप्रमाणे स्थानिक दादा आहेत. ज्या भागात नवीन झोपडी उभी राहते, तेथील दादा त्या जागेचे भाडे झोपडी उभारणाऱ्याकडून घेतो आणि त्याला सर्व नागरी सुविधा, संरक्षण देतो. करोनामुळे मुंबईतील झोपडपट्टी भागातील अनेक रहिवासी भीतीपोटी त्या भागातील झोपडय़ा विकू लागल्याची चर्चा आहे. ही मंडळी मुंबईतील झोपडय़ा मोठय़ा रकमेने विकून कल्याण, डोंबिवली, टिटवाळा भागांतील झोपडपट्टीत पाच ते १० लाख रुपयांना नवीन झोपडय़ा विकत घेत आहेत. कल्याणमध्ये लोकलने प्रवेश करताना हिरवीगार नेतिवली टेकडी शहराचे भूषण होते. हे भूषण वाढत्या झोपडय़ांच्या आक्रमणांमुळे लुप्त होण्याची शक्यता आहे. नेतिवली टेकडीवरील काही जमीन वन विभाग, काही केंद्र शासनाची आहे. टेकडीचा माथा पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची २० वर्षांपूर्वी पालिकेची योजना होती. दिवंगत माजी नगरसेविका सुधाताई साठे, अ‍ॅड. नंदकिशोर जोशी हे स्थळ विकसित व्हावे यासाठी प्रयत्नशील होते. या भागात क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे स्वातंत्र्यलढय़ाच्या काळात वास्तव्य होते. या टेकडीचे ऐतिहासिक स्थानमाहात्म्य ओळखून ती विकसित करावी म्हणून माजी नगरसेवक मुकुंद देसाई, राहुल दामले प्रयत्नशील होते. नंतरच्या सर्वच स्थानिक नगरसेवकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. प्रशासनाची इच्छाशक्ती नसल्याने हा विषय अडगळीत राहिला. अधिक माहितीसाठी जे प्रभागाचे प्रभाग अधिकारी भरत पाटील यांना संपर्क साधला, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 12:16 am

Web Title: new slums built on netivali hill in kalyan zws 70
Next Stories
1 गडकरी रंगायतनची इमारत अतिधोकादायक
2 शहरबात : उल्हासनगरच्या नियमानुकूल प्रक्रियेत प्रतिकूलता
3 वाडेघर येथे पालिका ठेकेदाराच्या अभियंत्याला भूमिपुत्रांची मारहाण
Just Now!
X