वाहतूक बदल करणे शक्य नसल्याचे पोलिसांचे मत

किशोर कोकणे

ठाणे : मुंबई आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कोपरी पुलाजवळ होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलिसांकडून वाहतूक बदल केले जातात. सकाळी गर्दीच्या वेळेत ठाणे दिशेची एक मार्गिका तर, सायंकाळी मुंबई दिशेची एक मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिली जाते. कोपरीच्या जुन्या पुलामुळेच हा बदल लागू करणे शक्य होत होते. परंतु या पुलाशेजारीच उभारण्यात आलेल्या नवीन मार्गिका लवकरच वाहतुकीसाठी खुल्या केल्या जाणार असून त्याचबरोबर जुन्या पुलाच्या ठिकाणी नव्या मार्गिका उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे नवीन मार्गिका सुरू झाली तरी, त्याठिकाणी पूर्वीसारखे वाहतूक बदल लागू करणे शक्य नसल्यामुळे या ठिकाणी कोंडी होण्याची शक्यता वाहतूक पोलिसांनी वर्तविली आहे.

मुंबई आणि ठाणे शहरातील वाहतुकीसाठी कोपरी रेल्वे पूल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा पूल अरुंद होता आणि धोकादायकही झाला होता. त्यामुळे या पुलाच्या रुंदीकरणाचे काम एमएमआरडीए आणि मध्य रेल्वेने हाती घेतले होते. जुना पूल तसाच ठेवून त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी २३ फूट रुंद नवीन मार्गिका तयार केल्या आहेत. या मार्गिका लवकरच वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. त्यानंतर जुन्या पुलाच्या ठिकाणी मार्गिका उभारणीचे काम सुरू होणार आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद होणार असल्यामुळे या भागातील वाहतुकीचे नियोजन करण्याचा मोठा पेच पोलिसांपुढे उभा राहिला आहे.

कोपरी पूल अरुंद असल्यामुळे होणारी कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून पुलाच्या ठिकाणी वाहतूक बदल लागू केले जात होते. सकाळच्या वेळेत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा भार जास्त असतो, तर या वेळेत मुंबईहून ठाण्याकडे येणाऱ्या वाहनांची संख्या कमी असते. सायंकाळच्या वेळेत ठाण्याकडे येणाऱ्या वाहनांचा भार जास्त असतो, तर मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या कमी असते. त्यामुळे सकाळच्या वेळेत ठाण्याच्या दिशेने येणारी एक मार्गिका मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी खुली करून दिली जात होती, तर सायंकाळच्या वेळेत मुंबई दिशेची एक मार्गिका ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीसाठी खुली करून दिली जात होती. या बदलामुळे कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटली होती. जुन्या पुलामुळेच असे बदल करणे शक्य होते. परंतु त्या पुलाचे काम सुरू होणार असल्यामुळे आता असे बदल करणे शक्य नसल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.

कमी रुंदीच्या मार्गिका

जुन्या पुलाच्या दोन्ही मार्गिका प्रत्येकी २६ फूट रुंद आहेत, तर नव्या मार्गिका प्रत्येकी २३ फूट आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी आता पूर्वीपेक्षा कमी रुंदीच्या मार्गिका उपलब्ध होणार आहेत, असेही वाहतूक पोलिसांनी सांगितले.