महावितरणकडून २४ कोटी रुपयांचा निधी; रोहित्रांची क्षमता वाढवणार
पालघर जिल्ह्यातील वीजयंत्रणा अद्ययावत करण्यासाठी महावितरणने पावले उचलली असून त्यासाठी २४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. विविध ठिकाणी उपकेंद्राची उभारणी, रोहित्रांची उभारणी, रोहित्रांची क्षमता वाढवणे, उच्चदाब व लघुदाब वाहिन्यांचे जाळे अद्ययावत करणे आदी कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील वीजयंत्रणा सुधारणेबाबतची माहिती महाविरणच्या वतीने सोमवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. जिल्ह्यातील वीजग्राहकांना अधिक गुणवत्तापूवर्क सेवा देण्यासाठी महावितरण प्रयत्नशील असल्याने महावितरणचे प्रादेशिक संचालक श्रीकांत जलतारे यांनी सांगितले. त्यासाठी महावितरणच्या मुख्य कार्यालयाने २४ कोटींचा निधी दिला असल्याची माहिती त्यांनी दिली. वीजचोरी करणाऱ्यांना अभय दिले जाणार नाही. त्यांच्यावर महावितरणमार्फत कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. आदिवासी वाडी-पाडय़ांवर वीज पोहोचवण्यासाठी सौभाग्य या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले. पालघर जिल्ह्यातील २५ पाडय़ांवर अद्याप वीज पोहोचलेली नाही. त्यासाठी तांत्रिक कारणे दूर करून वीज पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना अखंडित वीज
महावितरणने शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना हाती घेतल्या असून त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी आणि उच्चदाब वीजवितरण प्रणाली अशा महत्त्वाकांक्षी योजना महावितरण राबवत आहेत. सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार आहे. अटल सौर कृषीपंप योजनेच्या माध्यमातून दुर्गम भागातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा पुरवण्यात येत आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यातील दोन लाख २५ हजार शेतकऱ्यांना वीजवितरण प्रणालीतून वीजजोडणी देण्याचे काम सुरू असून शेतकऱ्यांच्या वीजविषय समस्यांचे निराकारण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही महावितरणतर्फे देण्यात आली.