कल्याण-डोंबिवलीत शवपेटीचे भाडे पाच हजारांच्या घरात

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत करोना रुग्णांची वाहतूक करणारे खासगी रुग्णवाहिकाचालक हे रुग्ण, नातेवाईकांकडून दुप्पट भाडे घेत आहेत. तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून महापालिका, जिल्हाधिकारी, परिवहन विभागाकडून कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

डोंबिवली पूर्वेतून पश्चिमेकडे जाण्यासाठी किंवा पश्चिमेतून पूर्वेत जाण्यासाठी खासगी रुग्णवाहिका पुरवठादारांकडून चार ते पाच हजार रुपये भाडे आकारले जात आहे, अशा तक्रारी आहेत. डोंबिवलीतील करोनाच्या रुग्णाला कल्याणला नेण्यासाठी आठ ते १० हजार रुपये आणि अन्य रुग्ण नेण्यासाठी चार ते पाच हजार रुपये आकारले जातात. रुग्णवाहिकेची सेवा घेण्यापूर्वीच दर सांगितला जातो. तो देण्यास रुग्ण तयार नसेल तर त्याला नेण्यास् नकार दिला जातो, असा अनुभव रुग्ण, नातेवाईकांनी सांगितला.

रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी दोन महिन्यांपूर्वी उपप्रादेशिक परिवहन विभागाने पालिकेला ७० ते ८० खासगी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. पालिकेकडे कल्याण, डोंबिवली मिळून दोन शववाहिन्या आहेत. त्याद्वारे सामान्य आजाराच्या रुग्णांना न्यावे लागत असल्याने या रुग्णवाहिका करोना रुग्णांसाठी दिल्या जात नाहीत. त्यामुळे करोना रुग्ण नातेवाईकांना खासगी रुग्णवाहिकांवर अवलंबून राहावे लागते. महापालिकेने रुग्णवाहिका चालकांचे नाव तसेच संपर्क क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. पैकी मोजक्याच रुग्णवाहिका चालकांचे मोबाइल सेवेत आहेत. ठरावीक रुग्णवाहिका चालक सेवा देत असल्याने ते हवे ते दर आकारून रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप देत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

रुग्णवाहिका चालकांकडून कल्याण-डोंबिवलीतून मुंबईत रुग्ण नेण्यासाठी १६ ते १८ हजार रुपये मागितले जातात. यामध्ये किट, हाताळणी, अन्य सहकाऱ्यांचा खर्च असे वाढीव दराचे कारण चालकांकडून सांगितले जाते. महापालिका हद्दीत दररोज किमान ९ ते १५ या दरम्यान करोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. रुग्णांना खासगी रुग्णवाहिकांवर अवलंबून राहावे लागते. अनेक वेळा डोंबिवलीतील स्मशानभूमीत तांत्रिक अडचण असेल तर कल्याणच्या स्मशानभूमीत मृतदेह न्यावा लागतो. त्यामुळेही चालक दर वाढवतात. रुग्णाचा रुग्णालयात झालेला लाखो रुपयांचा खर्च, त्यात रुग्ण दगावला तर वाहिका वाहतुकीसाठी पाच ते सहा हजार रुपये नातेवाईकांना मोजावे लागतात. कल्याणमधील बैलबाजारातील एका खासगी रुग्णालयातून रुग्ण कल्याणमधील होली क्रॉस रुग्णालयात नेण्यासाठी कार्डिअ‍ॅक रुग्णवाहिका चालकाने नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांना १८ हजार रुपये सांगितले होते. भाडय़ाचे कारण विचारले तर तेवढेच दर आहेत, असे उत्तर चालकाने दिले. त्या वाहकाला देवळेकर यांनी स्वत:ची ओळख आणि वाहतूक विभाग आयुक्ताकडे तक्रार करतो, असे सांगताच चालकाने आठ हजार रुपये आकारण्याची तयारी दर्शविली.

महापालिका अधिकाऱ्यांना या वाढीव भाडे दराविषयी विचारले तर ही जबाबदारी आमची नाही. यामध्ये वाहतूक अधिकाऱ्यांनी लक्ष घातले पाहिजे, असे सांगितले जाते.

शवपेटीचे दर गगनाला

पालिकेची स्मशानभूमीच्या बाहेर खासगी शवपेटी, मृतदेह घेऊन जाण्यासाठी स्वर्गरथ अशी व्यवस्था असते. रुग्ण मृत पावल्यानंतर त्याचे नातेवाईक येईपर्यंत अनेक नातेवाईक विजेरी शवपेटीची व्यवस्था करतात. यासाठी एक ते दोन हजार भाडे खर्च होईल, असा विचार नातेवाईक करतात. हा दर साडेपाच हजार रुपयांपर्यंत आकारला जातो. विठ्ठलवाडी स्मशानभूमीच्या बाहेर अशाच प्रकारे शवपेटी भाडय़ाने दिली जाते. कितीही तासासाठी ही सेवा घेतली तरी शवपेटीचा दर म्हणून पाच हजार रुपये आकारले जातात. काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेतील एका रहिवाशाचे हृदयविकाराने निधन झाले. त्याचा मृतदेह चार तास शवपेटीत ठेवण्यात आला होता. त्यासाठी पाच हजार रुपये आकारले, अशी तक्रार ठाकूर कुटुंबीयांनी केली. यासंदर्भात शवपेटी वितरकाने सांगितले की, शवपेटीची हाताळणी आदी सर्व व्यवस्था आम्ही करतो. शवपेटीचा वापर कितीही तासांसाठी असला तरी साडेपाच हजार रुपये भाडे आकारतो.