कचरामुक्त शहरासाठी फ प्रभागाचा उपक्रम

डोंबिवली : वारंवार आवाहन करूनही कल्याण-डोंबिवलीतील अनेक नागरी वस्त्यांमधील रहिवासी तसेच हॉटेलचालक कचराकुंडय़ा काढून टाकलेल्या ठिकाणी कचराफेक करत आहेत. अशा रहिवाशांवर दंडात्मक कारवाई करूनही ते ऐकत नसल्याने या रहिवाशांचे मनपरिवर्तन करण्यासाठी कचराकुंडय़ांच्या ठिकाणी रांगोळ्या काढून तेथे ‘या ठिकाणी कचरा टाकू नका,’ असे आवाहन कल्याण-डोंबिवली पालिका करत आहे.

डोंबिवली पूर्वेत नेहरू रस्ता, स. वा. जोशी शाळेच्या प्रवेशद्वारावरील कचराकुंडय़ा घनकचरा विभागाने हटविल्या आहेत. कचराकुंडय़ांच्या परिसरातील रहिवाशांच्या बैठका घेऊन आपल्या घरातील कचरा सोसायटीचे कचरासेवक आणि त्यांच्याकडून पालिकेच्या विविध प्रकारचा कचरा उचलणाऱ्या कचरावेचकांच्या ताब्यात देण्यास सांगितले आहे. हॉटेल व्यावसायिकांनी त्यांचे टाकाऊ अन्न हॉटेलच्या दारात येणाऱ्या पालिकेच्या कचरा गाडीत टाकण्याचे सांगण्यात आले आहे. तरीही अनेक रहिवासी घरातील कचरा रात्रीच्या वेळेत कचराकुंडय़ा काढून टाकलेल्या नेहरू रस्ता येथील छत्रपती शिवाजी उद्यान, स. वा. जोशी शाळेच्या प्रवेशद्वारावरील कचराकुंडी, पाथर्लीतील चौकात टाकत आहेत. दिवसा पालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना कोणी रस्त्यावर कचरा फेकताना दिसला, सोसायटीतून ओला, सुका कचरा कोणा रहिवाशाने दिला नाही तर त्याच्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई करतात. रात्रीच्या वेळेत पालिका कामगारांची गस्त नसल्याने अनेक रहिवासी, हॉटेल मालक कचराकुंडय़ा हटविलेल्या नेहरू रस्ता, जोशी शाळेजवळ उघडय़ावर कचरा फेकतात. या ठिकाणचे कचऱ्याचे ढीग उचलण्यासाठी पालिकेचे नाहक मनुष्यबळ खर्च होते, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.

रहिवासी सांगूनही ऐकत नसल्याने डोंबिवलीतील ‘फ’ प्रभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक वसंत देगलुरकर यांनी गुरुवारी दुपारी नेहरू रस्ता, स. वा. जोशी शाळा येथील कचऱ्याच्या ठिकाणी जागा स्वच्छ करून तिथे रांगोळ्या काढून येथे कचरा टाकू नका, असे आवाहन केले आहे. रांगोळीला धार्मिक महत्त्व आहे. किमान त्या रांगोळीकडे पाहून तरी रहिवासी कचरा त्या ठिकाणी फेकणार नाहीत, असे अधिकाऱ्यांना वाटते. पाथर्ली नाका येथे हिरवी कनात लावून कचऱ्याची जागा बंदिस्त करण्यात आली होती. रात्रीच्या वेळी काही रहिवाशांनी ती जाळी जाळून टाकून तिथे पुन्हा कचरा टाकण्यास सुरुवात केली. एवढे करूनही रहिवासी रात्रीच्या वेळेत कचरा फेकत असतील तर अशा ठिकाणी रात्रीच्या वेळेत पालिका कामगारांची गस्त ठेवून उघडय़ावर कचरा फेकणाऱ्यांवर पाच हजार रुपयांपासून ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याचा विचार आहे, असे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले. एखादा रहिवासी सातत्याने रस्त्यावर कचरा फेकत असेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाईबरोबर फौजदारी कारवाई केली जाणार आहे, असे कोकरे यांनी सांगितले.