कल्याण पूर्वेत नूतन विद्या मंदिर शाळेतील शिक्षक-विद्यार्थी दुर्गंधीने बेजार

कल्याण : कल्याण पूर्वेतील नूतन ज्ञान मंदिर शाळेसमोर परिसरातील रहिवासी कचरा टाकत असल्यामुळे शाळेच्या परिसराला अवकळा प्राप्त झाली आहे. प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये टाकाऊ पदार्थ पावसामुळे कुजून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांना या दुर्गंधी, कचऱ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर असावा. परिसराचे वातावरण प्रसन्न असावे असे म्हटले जाते. मात्र सध्या नूतन ज्ञान मंदिर शाळेसमोर टाकण्यात येत असलेल्या कचऱ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शाळेचा परिसरात चाळी, झोपडय़ा आहेत. त्यामुळे या भागातील रहिवासी येजा करताना शाळेसमोरील मोकळ्या जागेत कचरा टाकतात. रिक्षेतून येजा करणारे प्रवासीही या मोकळ्या मैदानात कचरा फेकतात.

शाळेसमोर कचरा फेकू नका म्हणून किती जणांना सांगायचे, असा प्रश्न शाळा व्यवस्थापनाला पडला आहे. घरात केलेल्या तोडफोडीचा मलबा या ठिकाणी आणून टाकला जात आहे. त्यामुळे हा मलबा पावसाच्या पाण्यात गटारात, परिसरात वाहून जातो. त्यामुळे गटार बंदिस्त होत आहेत. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असली तरी या ठिकाणी प्लास्टिक पिशव्या पाहण्यास मिळत आहेत. पालिका प्रशासनही प्लास्टिक बंदीविषयी  कठोर नसल्यामुळे व्यापारी, फेरीवाले प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत.

नूतन ज्ञान मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू होते. त्यामुळे तिकडे कचऱ्याची वाहने जाऊ शकत नाही. आता रस्ता पूर्ण झाल्याने या ठिकाणी कचरावाहू वाहने जातील. कामगारांनी त्या ठिकाणचा कचरा गोळा करून तो तातडीने उचलण्याची व्यवस्था केली आहे. 

– मोहन दिघे, आरोग्य निरीक्षक