नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रहिवासी, व्यापारी, वाहनचालकांवर कारवाईचे आदेश

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील करोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर करोना संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेले नियम धुडकावणाऱ्या रहिवासी, व्यापारी, वाहनचालकांवर कठोर कारवाईचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.

रुग्णसंख्या वाढत असलेल्या प्रभागांची सूर्यवंशी आणि पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पाहणी केली. त्या वेळी त्यांनी बेशिस्त वागणाऱ्यांची अजिबात गय करू नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या. टाळेबंदी शिथिल केल्यानंतर नागरिक घराबाहेर पडत आहेत. खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. यामुळे शहरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली असून या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून प्रशासनाने शहरातील करोना रुग्णसंख्या अधिक असलेले ३२ प्रभाग तीव्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. या प्रभागाच्या चारही सीमा पालिका, पोलिसांनी बंद करू टाकल्या आहेत. या प्रभागातून अत्यावश्यक सेवा वगळता कोणाही रहिवाशाला बाहेर पडण्यास मुभा देण्यात आलेली नाही. या क्षेत्रात जाण्यास मज्जाव केला जात आहे.

पोलिसांची पथके चौकांमध्ये दुचाकी, चारचाकी, खासगी वाहनांची तपासणी करून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी मुभा देत आहेत. अनावश्यक वाहने रस्त्यावर आणणाऱ्यांवर दंड, वाहन जप्तीची कारवाई केली जात आहे.

प्रतिबंधित क्षेत्र प्रभाग

मांडा, मोहने, गौरीपाडा, चिखलेबाग-मल्हारनगर, गोविंदवाडी, रोहिदासवाडा, जोशीबाग, विजयनगर, आमराई, तिसगाव, दुर्गानगर, कोळसेवाडी, चिकणीपाडा, गणेशपाडी, जरीमरीनगर, शिवाजीनगर, आनंदनगर, चोळेगाव, शिवमार्केट, सावरकर रस्ता, सारस्वत वसाहत, रामनगर, म्हात्रेनगर, तुकारामनगर, सुनीलनगर, गांधीनगर, पिसवली, ठाकूरवाडी, नवागाव, कोपर रस्ता, नांदिवलीतर्फ पंचानंद.

अत्यावश्यक दुकानेच सुरू

प्रतिबंधित क्षेत्रात औषध दुकाने, सिलेंडर पुरवठा, रुग्णालय सुरू राहणार आहेत, तर दूध, बेकरी, किराणा, भाजीपाला ही दुकाने सकाळी नऊ ते पाच या वेळेत सुरू राहणार आहेत. उर्वरित सर्व प्रकारची दुकाने पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. दुकानदारांनी घरपोच सेवेला प्राधान्य द्यावे. भाजी विक्रेत्यांनी हातगाडीवरून विक्री व्यवहार करावा, असे आदेश आयुक्त सूर्यवंशी यांनी दिले आहेत.