कुळगाव-बदलापूर नगरपालिका सभेत शाब्दिक चकमक
कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने शिवसेनेतील पक्षांतर्गत संघर्ष आज पुन्हा चव्हाटय़ावर आला. गेल्या काही दिवसांपासून नगराध्यक्ष वामन म्हात्रे आणि पाणी पुरवठा सभापती शैलेश वडनेरे यांच्यातील वादाचा दुसरा अंक मंगळवारी सभेत पहावयास मिळाला.
कुळगाव बदलापूर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली. यात मुख्याधिकारी देविदास पवार यांच्याकडून कामांच्या निविदा अडवली जातात, त्यावर वेळेत निर्णय घेतला जात नाही असा आरोप भाजप नगरसेवकांनी केला. त्यांच्या सुरात सुर मिसळत पाणी पुरवठा सभापती शैलेश वडनेरे यांनीही मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या काही महिन्यांत मी अनेक पत्रे प्रशासनाला पाठवली आहेत, मात्र त्यावर कारवाई केली जात नाही, पत्रांना उत्तरे दिली जात नाही, असा आरोप करत सभेचे अध्यक्ष नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांना जाब विचारला. त्यावर संतापलेल्या म्हात्रे यांनी वडनेरे यांना सभाशास्त्राचा अभ्यास करून या, अन्यथा बाहेर निघून जा, जास्त बोलाल तर बाहेर काढेन, अशा शब्दांत फटकारल्याने सभेत काही काळ वातावरण तापले होते. मात्र या प्रकरणाने या दोघांतील वाद अद्याप संपलेला नाही हे सिद्ध झाले. या वादावेळी सत्ताधारी पक्षातच एकी नसल्याचे समोर आले. सत्ताधारीच प्रश्न विचारतात, ज्यांचे काम उत्तरे द्यायचे आहे, मात्र विविध विभागाचे सभापतीच प्रश्न विचारतात तर आम्ही काय करायचे असा सवाल यावेळी भाजप गटनेत्यांनी केला.
दरम्यान, नगरपरिषदेच्या वार्षिक अर्थसंकल्पीय सभेतही शैलेश वडनेरे आणि नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यातील वाद सभागृहास पहावयास मिळाला होता. त्यानंतर सभागृहाबाहेरही एका प्रकरणी शैलेश वडनेरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणालाही या दोघांतील वादाची किनार होती.