डोंबिवलीच्या अर्धवट पुलावर शिवसेना नेत्याचा सेल्फीसाठी अट्टहास
डोंबिवली स्थानकालगत असलेल्या पादचारी पुलावर छप्पर उभारण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. हे काम करत असताना प्रवाशांना दुखापत होऊ नये यासाठी हा पूल पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. असे असताना स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत शिवसेनेचे स्थानिक नेते दीपेश म्हात्रे सोमवारी सायंकाळी या पुलावर अचानक अवतरले आणि सेल्फीचा लखलखाटच येथे सुरू झाला. दीपेशरावांच्या उपस्थितीमुळे इतर शिवसैनिकांसोबत प्रवासीही या पुलाची पायरी चढू लागले. त्यामुळे दुरुस्तीच्या कामामुळे प्रवाशांना अपघात होऊ नये यासाठी बंद ठेवण्यात आलेला हा पूल अचानक खुला करण्यात आल्याने यानिमित्ताने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
डोंबिवलीतील शिवसेनेचे युवा नेते दीपेश म्हात्रे यांनी या पुलाच्या दुरुस्तीसाठी आग्रह धरत त्यासाठी मोठा निधी मिळवून दिला आहे. दुरुस्तीचे काम सरू असताना याठिकाणी कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून हा पूल गेले दोन ते अडीच महिने बंद ठेवण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम अर्धवट असताना आणि दुर्घटना टळावी यासाठी बंद करण्यात आलेल्या या पुलावरील हा सेल्फी धिंगाणा पाहून अनेक जाणकारांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
या पादचारी पुलावर अद्यापही विजेच्या वाहिन्या तसेच कापड टाकण्याचे काम सुरू आहे. असे असताना केवळ तरुणांसोबत शायनिंग सेल्फी दिवस साजरा करता यावा यासाठी शिवसेना नेत्याच्या हट्टाने तर हा पूल खुला केला गेला नाही ना, असा सवालही उपस्थित होत आहे.

दुर्घटनेची भीती कायम
या पुलावर कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून जागोजागी सावधानतेचे फलक लावण्यात आले होते.सध्या पुलाचे कापड टाकण्याचे काम सुरू असून त्याबरोबरच पायऱ्यांची दुरुस्ती, लोखंडी रेलिंग यासाठीचे विजेचे काम सुरू आहे. तसेच कामासाठी लागणारे साहित्य इतस्तत पसरलेले आहे. त्यामुळे प्रवाशांना येजा करण्यासाठी हा पूल बंद आहे.

पुलावर स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली होती. नागरिकांसाठी तो खुला केला नव्हता. नागरिकांनी स्वेच्छेने या ठिकाणी येऊन स्वतची छबी टिपण्याचा प्रयत्न केला. कुणाच्या हट्टाने हा पूल खुला केला गेला असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल.
-दीपेश म्हात्रे, माजी सभापती

हा पूल खुला करण्यात आला नव्हता. कंत्राटदाराने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्युत रोषणाई केली होती. ती पाहून काही प्रवासी ही रोषणाई पाहण्यासाठी आले आणि सेल्फी काढू लागले. या पुलाचे काम अद्याप सुरू असून तो खुला म्केलेला नाही.
-सुभाष पाटील, कार्यकारी अभियंता