४२ मोबाइल, ७७ डेबिट-क्रेडिट कार्ड जप्त

मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरांतील मॉलमध्ये खरेदीत मग्न असलेल्या महिलांच्या पर्स व मोबाइल लांबवण्यात पटाईत असलेल्या बप्पी रतन भट्टाचार्य या भामटय़ाला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे शाखेने अटक केली आहे. मीरा रोड येथील त्याच्या घरातून आतापर्यंत दीड लाख रुपये किमतीचे ४२ मोबाइल, ७७ डेबिट-क्रेडिट कार्ड, चार आधारकार्ड, १४ पॅनकार्ड, आठ वाहन परवाने आणि चार मतदान ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. महिलांचे मोबाइल चोरल्यानंतर त्यातील क्रमांकांवरून तो महिलांना फोन करून अश्लील बोलत असल्याची बाबही तपासात पुढे आली आहे.

गर्दीच्या ठिकाणी चोऱ्या करणाऱ्यांनी अलीकडच्या काळात मॉलसारख्या गजबज असलेल्या ठिकाणांकडे आपला मोर्चा वळवला आहे. मॉलमध्ये फिरण्यात किंवा खरेदीत मग्न असलेल्या महिलांना हेरून त्यांच्या पर्स किंवा मोबाइल लांबवण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढत आहेत. या पाश्र्वभूमीवर बप्पीची अटक महत्त्वाची मानली जात आहे. ठाण्यातील कोरम आणि डीमार्ट सारख्या ठिकाणांहून महिलांची पर्स व मोबाइल चोरीला जाण्याचे प्रकार वाढू लागले होते. या पाश्र्वभूमीवर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर आणि मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शशिकांत माने यांनी मॉलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे तपास सुरू केला होता. त्या फुटेजच्या आधारे बप्पीला (४२) ढोकाळी परिसरातून अटक करण्यात आली. त्याने मुंबईतील गोरेगाव, मालाड, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा रोड या मॉलमधील महिला ग्राहकांची पर्स व मोबाइल चोरी केल्याची बाब तपासात पुढे आली आहे. मॉलमध्ये महिला वस्तू खरेदी करीत असताना किंवा कॅश काऊंटरवर बिल देत असताना बप्पी त्यांच्या शेजारी जाऊन उभा राहायचा. त्यानंतर त्यांचे लक्ष विचलित करून त्यांची पर्स व मोबाइल लंपास करायचा, अशी माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली. चोरलेल्या मोबाइलच्या आधारे पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू शकतात, अशी त्याला भीती होती. त्यामुळे चोरलेले मोबाइल तो विकत नव्हता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

मीरा रोड परिसरात राहणारा बप्पी दोन वर्षांपासून अशा गुन्ह्यांत सक्रिय होता. त्याच्या मीरा रोड येथील घराच्या झडतीत दीड लाख रुपये किमतीचे ४२ मोबाइल, ७७ डेबिट व क्रेडिट कार्ड, चार आधारकार्ड, १४ पॅनकार्ड, आठ वाहन चालविण्याचा परवाना आणि चार मतदान ओळखपत्रे असा ऐवज सापडला.   काही नागरिक बँकेचा पिन कोड लक्षात राहत नाही म्हणून कार्डाच्या पाठीमागे लिहून ठेवतात. अशीही काही कार्ड त्याच्या हाती लागली होती. त्याद्वारे त्याने बँकेतून पैसे काढल्याची बाब पुढे आली आहे.