दिव्यात पहिला रुग्ण;  शहरातील रुग्णांची संख्या ४४ वर

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये शनिवारी दिवसभरात सहा नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यात एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह डॉक्टर आणि त्याच्या मुलाचा समावेश आहे. याशिवाय दिवा परिसरातील एका रुग्णाचा समावेश असून हा दिवा परिसरातील पहिला रुग्ण आहे. कळवा आणि मुंब्रा परिसरात सर्वाधिक प्रत्येकी १४ रुग्ण आहेत. शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या आता ४४ इतकी झाली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून महापालिका क्षेत्रात शुक्रवापर्यंत एकूण ३८ करोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी २५ रुग्ण हे कळवा आणि मुंब्रा परिसरातील होते. असे असतानाच महापालिका क्षेत्रात शनिवारी सहा नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून करोनाबाधित रुग्णांचा आकडा ४४ इतका झाला आहे. सहा नव्या रुग्णांमध्ये कळवा परिसरातील एका सहायक पोलीस निरीक्षकाचा समावेश असून तो ठाणे शहरातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. उर्वरित पाच रुग्ण खारेगाव, मुंब्रा, दिवा आणि ढोकाळी भागातील आहेत. त्यामध्ये ढोकाळी भागातील डॉक्टर आणि त्याच्या मुलाचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रातील दिवा परिसरात अजूनपर्यंत करोनाबाधित रुग्ण आढळला नव्हता. मात्र, या भागात शनिवारी पहिला रुग्ण आढळला आहे. दाटीवाटीचा परिसर असल्यामुळे या भागाची चिंता वाढली आहे. असे असले तरी दोन दिवसांपुर्वीच हा संपुर्ण परिसर टाळेबंद करण्यात आला असल्यामुळे करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला चांगली मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

पोलीसाला करोना

ठाणे पोलिस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. हा अधिकारी प्रकृती ठिक नसल्यामुळे काही दिवसांपुर्वीच सुट्टीवर गेला होता. नाशिक येथील घरी गेल्यानंतर त्यांनी तपासणी केली होती. त्यात लागण झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.