महिलांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर होणार असल्याचा प्रशासनाचा दावा

ठाणे : ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात आणखी दहा महिलांसाठीच्या तेजस्विनी बस दाखल झाल्या आहेत. शहरातील दहा मार्गावर बुधवारपासून या बस दहा मार्गावर चालविण्यात येणार आहेत. यामुळे महिलांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

राज्यातील महिला प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा या उद्देशातून शासनाने तेजस्विनी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

या निर्णयानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर आणि कल्याण-डोंबिवली या शहरांसाठी ३०० बसा देण्यात

येणार आहेत. त्यापैकी ठाणे महापालिकेस ५० तेजस्विनी बस खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने ६ कोटी रुपयांचा निधीही दिला आहे. त्यामुळे ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात तेजस्विनी बसगाडी दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

विधानसभा निवडणुकीपूर्वी एक तेजस्विनी बस परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाली होती. त्यापाठोपाठ आणखी दहा तेजस्विनी बसगाडय़ा परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

ठाणे स्थानकातून सकाळ आणि सायंकाळ या वेळेत नोकरदार वर्ग प्रवास करतात. या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे स्थानकातून शहराच्या विविध भागात जाणाऱ्या दहा मार्गावर तेजस्विनी बस चालविण्यात येणार आहेत. ठाणे शहराच्या विविध भागातून स्थानकापर्यंत सकाळी ७ ते १० यावेळेत तर ठाणे स्थानकातून शहराच्या विविध भागांमध्ये सायंकाळी ५ ते रात्री ९ यावेळेत बस चालविण्यात येणार आहेत. उर्वरित बसफेऱ्या सर्वसाधारण चालविण्यात येणार आहेत.

या मार्गावर बस धावणार

* ठाणे स्थानक पश्चिम ते वृंदावन सोसायटी.

* ठाणे स्थानक पश्चिम ते लोकमान्यनगर.

* ठाणे स्थानक पश्चिम ते वागळे आगार.

* ठाणे स्थानक पश्चिम ते गावंडबाग.

* ठाणे स्थानक पश्चिम ते पवारनगर.

* ठाणे स्थानक पश्चिम ते खारेगाव.

* ठाणे स्थानक पश्चिम ते कासारवडवली.

* ठाणे स्थानक पश्चिम ते धर्माचापाडा.

* ठाणे स्थानक पश्चिम ते दादलानीपार्क .

*  ठाणे स्थानक पश्चिम ते कोलशेत.