किशोर कोकणे

पावसाळ्यानंतर काम सुरू होण्याची चिन्हे

ठाणे : शिळफाटय़ाहून कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचा असलेल्या काटई रेल्वे पुलाच्या निविदा प्रक्रियेस अखेर सुरुवात झाल्याने येत्या काही महिन्यात हे काम प्रत्यक्ष सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. काटई रेल्वे पुलाच्या जुन्या पुलाशेजारी नव्याने अतिरिक्त मार्गिका उभारणी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. करोना काळात राज्य सरकार आणि विविध महामंडळांना आर्थिक मर्यादा आल्याने या कामाला नेमकी कधी सुरुवात होणार याविषयी संभ्रमाचे वातावरण होते. दरम्यान, या कामाची निविदा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने काढली असून २७ कोटी रुपयांची आधारभूत किंमत ठरविण्यात आली आहे.

कल्याण-शिळफाटा हा मार्ग ठाणे तसेच नवी मुंबईहून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अवजड वाहनेही या मार्गावरून ये-जा करत असतात. त्यामुळे दिवसाला ४० ते ५० हजार वाहने या मार्गावरून धावत असतात. याच मार्गावर काटई रेल्वे पूल आहे. मुंबई आयआयटीने हा पूल धोकादायक ठरविला आहे. त्यामुळे हा पूल नव्याने बांधण्याचा विचार रेल्वे तसेच एमएसआरडीसीकडून सुरू होता. दरम्यान, एमएसआरडीसीकडून येत्या काही महिन्यांत जुन्या काटई रेल्वे पुलाला लागून शिळफाटय़ाच्या दिशेने येण्यासाठी आणि शिळफाटय़ाहून डोंबिवलीच्यादिशेने जाण्यासाठी अतिरिक्त मार्गिका तयार करण्यात येणार आहे. मात्र हे काम पूर्ण होण्यासाठी वर्षभराहून अधिकचा कालावधी जाणार आहे.

या मार्गिका तयार झाल्यानंतर रेल्वे येथील जुना रेल्वे पूल पाडणार असून त्याठिकाणी नवा रेल्वे पूल तयार केला जाणार आहे. हे दोन्ही काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना एकूण आठ मार्गिका ये-जा करण्यासाठी उपलब्ध होणार असून येथील वाहतूक कोंडीतून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

काटई रेल्वे पूलाला लागून दोन पूल उभारणीसाठी निविदा काढण्यात आली आहे. निविदा मंजूर झाल्यास या कामास सुरुवात होईल. त्यामुळे दोन नव्या मार्गिका वाहनचालकांना उपलब्ध होणार आहे. या मार्गिकांमुळे वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.

– एस. व्ही. सोनटक्के, मुख्य अभियंता, एमएस

वाहतूक कोंडीतून दिलासा

सध्या कल्याण-शिळफाटा मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते. त्यात काटई रेल्वे पूल अरुंद आहे. त्यामुळे या पुलावर एखादा अपघात घडल्यास ही वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ येत असतात. त्यामुळे हा मार्ग आठपदरी झाल्यास वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा वाहन चालकांना मिळणार आहे.