खाडीवरील प्रयोगानंतर ठाणे महापालिकेचा उपक्रम

ठाणे महापालिका प्रशासनाने आता वेगवेगळ्या स्रोतांमार्फत वीजनिर्मिती करण्याचे प्रयत्न सुरूकेले असून त्याचाच एक भाग म्हणून खाडी आणि सौर ऊर्जेपाठोपाठ आता पाणी वितरण यंत्रणेवर जलविद्युत प्रकल्पाची उभारणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या प्रकल्पामधून शहरातील पाच ठिकाणी एकूण ६० किलो वॅट विजेची निर्मिती केली जाणार आहे. खासगी लोकसहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्यामुळे त्यासाठी महापालिकेला पैसे खर्च करावे लागणार नाहीत. उलट या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज कमी दरात मिळणार आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

गेल्या दोन वर्षांपासून ठाणे महापालिका प्रशासनाने अपारंपरिक ऊर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी ठाणे, कळवा तसेच मुंंब्रा या शहरांतील महापालिकेच्या २१ वास्तूंवर सौर ऊर्जेपासून वीज निर्माण करणारी यंत्रणा बसविण्याचा निर्णय प्रशासनाने मध्यंतरी घेतला होता. या प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. खासगी लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पातून १० मेगावॅट विजेची निर्मिती केली जाणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या ५६ शाळांच्या छतावरही अशा प्रकारची यंत्रणा बसवून त्यातून १५३ मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करण्याचा महापालिकेचा विचार आहे. याशिवाय, ठाणे शहराला लाभलेल्या खाडीच्या पाण्यावर वीजनिर्मिती प्रकल्प राबविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या दोन्ही प्रकल्पांपाठोपाठ आता प्रशासनाने शहरातील पाणी वितरण यंत्रणेवर जलविद्युत प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. येत्या २० जुलैला होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

पाच प्रकल्प

मुंब्रा येथे पाच किलोवॅट, ऋतुपार्क येथे पाच किलोव्ॉट, सिद्धेश्वर येथे २० किलोवॅट, सोहम जलकुंभ २० किलोवॅट, जेल जलकुंभ १० किलोवॅट अशी एकूण ६० किलोव्ॉट वीजनिर्मिती या प्रकल्पातून केली जाणार आहे.

प्रकल्प असा

पाणी वितरण यंत्रणेवर राबविण्यात येणाऱ्या जलविद्युत प्रकल्पासाठी महापालिका संबंधित ठेकेदाराला जलकुंभ आणि जलवाहिन्यांच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देतील. या जागेवर वीजनिर्मितीसाठी अत्याधुनिक टर्बाइन, जनित्र संच व वीज उपकरणे बसविण्यात येणार आहेत. जलवाहिन्यांमधून जलकुंभामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर टर्बाइनच्या साहाय्याने वीजनिर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.