लोकसत्ता प्रतिनिधी

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकातील वरिष्ठ तिकिट तपासनीस शशांक दीक्षित यांच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाचे प्राण वाचले. एक प्रवासी पुष्पक एक्सप्रेसच्या डब्यात चढताना दरवाजात लोंबकळत असल्याचे दिसले. घाईने गाडी पकडताना या प्रवाशाला दरवाजाजवळील एक लोखंडी दांडा कसबसा धरता आला. गाडीने वेग घेतल्याने प्रवाशाला तोल सांभाळताना दरवाजातील दुसऱ्या हाताजवळील लोखंडी दांडा धरता येत नव्हता. गाडी फलाटाबाहेर जाण्यापूर्वीच तपासनीस दीक्षित यांच्या हा प्रकार निदर्शनास येताच, त्यांनी प्रवासी लोंबकळत असलेल्या दरवाजाच्या दिशेने धावत जाऊन त्याला आत लोटले. एका प्रवाशावर बेतलेला मोठा धोका टळला. वरिष्ठ रेल्वे तिकिट तपासनीस शशांक दीक्षित यांच्या या कार्याची मध्य रेल्वेच्या वरिष्ठांनी दखल घेऊन त्यांचे कौतुक केले आहे. यापूर्वीही अशाच कार्याबद्दल त्यांचा मध्य रेल्वेतर्फे विशेष सन्मान देऊन गौरव करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी मुंबईहून पुष्पक एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चारवर आली होती. तेथे गाडीतून उतरलेल्या आणि इतर प्रवाशांच्या तिकिट तपासणीचे काम दीक्षित यांच्याकडून सुरू होते. पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवासी गाडी थांबल्याने फलाटावरील खाद्यपदार्थ खरेदी करत होता. तोपर्यंत गाडी सुरू झाली. धावत-पळत गाडी पकडताना प्रवाशाला दरवाजाजवळील आधारासाठी असलेला एकच लोखंडी हातदांडा पकडता आला. दुसरा दांडा पकडण्याचा प्रयत्नात त्याचा तोल जात होता. इंजिनपासून तिसऱ्या डब्यात हा प्रकार सुरू होता.  गाडीने आणखी वेग घेऊन फलाट सोडला असता तर हा प्रवासी या फटीत किंवा फलाटाबाहेर पडला असता. हा प्रकार लक्षात येताच वरिष्ठ तिकिट तपासनीस दीक्षित प्रवासी लोंबकळत असलेल्या दरवाजाच्या दिशेने गेले. त्यांनी प्रसंगावधान राखून प्रवाशाच्या पाठीला जोर लावून वेगाने डब्यात लोटले. पाठीमागून ढकलल्याने प्रवासी डब्यात गेला.