बेकायदा फलकप्रकरणी गुन्हा मागे घेण्याची पालिकेची पोलिसांना विनंती

आमच्याप्रमाणेच अन्य पक्षांच्या नेत्यांवरही शहर विद्रूपीकरणाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेवर दबाब टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र, हे दबावतंत्र कार्यकर्त्यांच्या अंगलट आले आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या दबावापुढे महापालिकेने नमते घेत भाजप शहराध्यक्ष संदीप लेले यांचे शहर विद्रूपीकरणाच्या गुन्ह्य़ातून नाव वगळण्याचे पत्र वागळे इस्टेट पोलिसांना दिले आहे. त्यामुळे या गुन्ह्य़ातून शहराध्यक्ष लेले सुटले असले तरी कार्यकर्त्यांवरील गुन्हा मागे घेण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले यांच्या वाढदिवसांचे बेकायदा फलक वागळे इस्टेट परिसरात लावण्यात आले होते. या फलकांवर महापालिकेने कारवाई करत या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये संदीप लेले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आरोपी केले होते. या कारवाईमुळे दुखावलेल्या पक्ष नेत्यांनी पालिकेतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यापाठोपाठ भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी महापालिकेच्या सर्वच प्रभाग समित्यांमध्ये जाऊन अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शहरात ठिकठिकाणी विनापरवाना लावलेल्या अन्य पक्षांचे फोटो सादर करताना या फलकांवरील पक्षांच्या नेत्यांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर फलकांचा वाद चिघळण्याची शक्यता पाहता वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यासाठी  पालिकेने वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात एक पत्र दिले होते. या पत्रात संदीप लेले यांचे नाव वगळण्यात आल्याने पालिकेने दाखल केलेल्या गुन्ह्य़ात त्यांचे कार्यकर्ते आरोपी म्हणून असणार आहेत. त्यामुळे फलकबाजीविरोधातील गुन्हा मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले खरे, पण त्यामधून शहराध्यक्ष सुटले तर कार्यकर्ते मात्र अडकले आहेत.

विनापरवाना फलक लावल्याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. संदीप लेले यांच्या वाढदिवसांचे हे फलक होते. मात्र, ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावले होते. लेले यांनी स्वत: हे फलक लावलेले नव्हते. तसेच पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा मागे घेता येत नाही. त्यामुळे या गुन्ह्य़ातून संदीप लेले यांचे नाव वगळण्यासंबंधीचे पत्र पोलिसांना दिले आहे. त्याचप्रमाणे या संदर्भात चुकीची माहिती देणाऱ्या संबंधितांकडून खुलासा मागवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.

-पी.पी. मकेश्वर, सहायक आयुक्त, वागळे प्रभाग समिती.