दररोज ३० टक्के फेऱ्या रद्द, उत्पन्नात मोठी घट

ऋषिकेश मुळे / आशीष धनगर, ठाणे</strong>

नोकरदार वर्ग, बांधकाम क्षेत्रापाठोपाठ वाहतूक कोंडीचा फटका जिल्ह्य़ातील विविध महापालिकांच्या परिवहन उपक्रमांना बसत असल्याचे दिसत आहे.

कोंडीमुळे टीएमटी, केडीएमटी तसेच वसई-विरार महापालिका परिवहन उपक्रमांतील बसगाडय़ांच्या ३० टक्के फेऱ्या दररोज रद्द होत आहेत. त्यामुळे एक ते तीन लाख रुपयांनी उत्पन्न घटत असल्याने हे उपक्रमही आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे.

जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई या महापालिका ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर परिवहन उपक्रम चालवितात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे ठाणे तसेच कल्याण-डोंबिवलीचे उपक्रम काहीसे तोटय़ात असल्याचे चित्र आहे. त्यात आता वाहतूक कोंडीची भर पडली आहे.

ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) ताफ्यात ४६७ बसगाडय़ा आहेत. त्यांची मीरा-भाईंदर, बोरिवली, कासारवडवली, ओवळा, ठाणे स्थानक, वृंदावन, भिवंडी, बाळकुम, वागळे इस्टेट, मुंब्रा, शिळफाटा या मार्गावर वाहतूक सुरू असते. त्यापैकी ठाणे-बोरिवली हा सर्वाधिक उत्पन्नाचा मार्ग म्हणून ओळखला जातो. मात्र, ठाणे तसेच घोडबंदर भागातील महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून होत असलेल्या वाहतूक कोंडीचा फटका या मार्गावरील बससेवेला मोठय़ा प्रमाणात बसत आहे. या मार्गावरील बस संथ गतीने जात असल्याने दरदिवशी अनेक फेऱ्या रद्द होत आहेत. शहरातील अंतर्गत मार्गावरही अशीच परिस्थिती असून यामुळे दररोज ३० टक्के बसफेऱ्या रद्द होत असल्याचे परिवहन प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवा उपक्रमाच्या बसगाडय़ा वसई शहरात तसेच नालासोपारा आणि वसई ते ठाणे या मार्गावर चालविण्यात येतात. या बसगाडय़ा घोडबंदर मार्गावरून वाहतूक करत असल्याने तेथील कोंडीचा फटका या बस सेवेलाही बसू लागला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन सेवेच्या (केडीएमटी) ताफ्यात १३८ बसगाडय़ा असून त्यापैकी ८५ बसगाडय़ा कल्याण शहर आणि ग्रामीणसह भिवंडी, वाशी, बेलापूर तसेच पनवेल या मार्गावर चालविण्यात येतात. मात्र, विविध कारणांमुळे पनवेल, भिवंडी आणि वाशी या मार्गावर होत असलेल्या कोंडीचा फटका या बस सेवेला बसत आहे.

आकडेवारी..

टीएमटी

ताफ्यातील गाडय़ा : ४६७

दररोज रद्द होणाऱ्या फेऱ्या : २० ते २५ टक्के

रोजची उत्पन्नतूट : २ ते ३ लाख रुपये

केडीएमटी

ताफ्यातील गाडय़ा : १३८

दररोज रद्द होणाऱ्या फेऱ्या : १० टक्के

रोजची उत्पन्नतूट : दीड लाख रुपये

वसई-विरार महापालिका परिवहन उपक्रम

ताफ्यातील गाडय़ा : १४९

दररोज रद्द होणाऱ्या फेऱ्या : ३० टक्के

रोजची उत्पन्नतूट : ७० हजार रुपये