ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात रविवारी ६८८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे करोनाच्या  एकूण रुग्णांची संख्या आता १५ हजार ८६३ इतकी झाली आहे.

एका दिवसात १३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्य़ातील मृतांचा आकडा ५११ इतका झाला आहे.

रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये ठाणे शहरात १३४, नवी मुंबईत १६९, कल्याण-डोंबिवली शहरातील ७८, भिवंडीत १०४, अंबरनाथमध्ये ६३, उल्हासनगरमध्ये १८, बदलापूरमध्ये १०, मीरा-भाईंदरमध्ये ७९ आणि ठाणे ग्रामीणमधील ३३ रुग्णांचा समावेश आहे. रविवारी जिल्ह्य़ात १३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून त्यामध्ये ठाणे शहरातील पाच, नवी मुंबईतील चार, कल्याणमधील तीन आणि अंबरनाथमधील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील मृतांचा आकडा ५११ वर पोहोचल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

नवी मुंबई चार हजारच्या उंबरठय़ावर

नवी मुंबई शहरात  शनिवारी १९१ तर रविवारी १६९ करोना रुग्ण सापडले असून शहरातील करोना रुग्णांची संख्या ३,९०३ झाली आहे. करोना रुग्णांबरोबर त्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. रविवारी चार जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ११८ जणांचा मृत्यू झाला आहे.

वसई-विरारमध्ये ३२ जणांना संसर्ग

वसई : वसई-विरार शहरात रविवारी दिवसभरात ३२ नवीन करोनारुग्ण आढळून आले तर २१ जणांना करोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. रविवारच्या रुग्णांमध्ये वसईत १०, नालासोपारा १०, विरार ९, नायगाव २ व ग्रामीण भागांतील एका रुग्णाचा समावेश आहे. शहरी भागातील करोना रुगणांची आकडेवारी १ हजार ५०८ वर पोहचली आहे.

पनवेल तालुक्यात ५७ नवे करोनाबाधित

पनवेल : तालुक्यामध्ये रविवारी ५७ नवे करोनाबाधित सापडल्याने करोना रुग्णांचा आकडा १२७२ वर पोहोचला आहे. रविवारी उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये खारघर येथील दोघे तर खिडुकपाडा येथील एक रुग्णाचा समावेश आहे. पनवेल ग्रामीणमधील १३ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पनवेल तालुक्यात ५३ जणांचा मृत्यू झाला आहे.