वस्तू व सेवाकरातील वाढीमुळे शुल्क वाढणार

ठाणे : ठाण्यात ना वाहनतळ क्षेत्रात उभ्या असलेल्या वाहनचालकांना आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत नव्या वर्षांपासून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाहन टोइंग करताना वाहनचालकांना दंडाच्या रकमेसोबत यासंबंधीची ठरावीक रक्कम आकारली जात असते. टोइंगसाठी आकारल्या जाणाऱ्या रकमेवर वस्तू आणि सेवाकराची वाढीव रक्कम येत्या वर्षांपासून आकारली जाणार आहे. त्यामुळे दंडाच्या एकूण रकमेत वाढ होण्याची शक्यता ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली. मात्र, मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत हे दर कमीच असणार आहेत.

ठाण्यात रस्त्याकडेला तसेच नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांविरोधात वाहतूक पोलिसांकडून टोइंग वाहनाद्वारे कारवाई केली जाते. यामध्ये कारवाई करण्यात आलेल्या वाहनचालकाला नो पार्किंगचा दंड आणि टोइंगचा दर असा एकूण दंड आकारला जातो. सध्या ठाणे आयुक्तालय क्षेत्रात दुचाकीसाठी टोइंगचे १०० रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी २०० रुपये आकारणी करण्यात येते. त्यामुळे दुचाकीसाठी वाहनचालकांना ३००, तर चारचाकीसाठी ४०० रुपये मोजावे लागत आहेत. तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी केली होती. त्यानंतर मुंबईतही एखादे वाहन उचलल्यास टोइंगच्या दरासोबतच वस्तू आणि सेवा करही कारवाई करण्यात आलेल्या वाहनचालकाला भरावा लागत आहे. ठाण्यात टोइंगच्या दरासोबत वस्तू आणि सेवा कराची आकारणी करण्यात येत नव्हती. आता या टोइंगच्या दरामध्ये वस्तू आणि सेवा शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या १५ ते २० दिवसांत वस्तू आणि सेवा कराचा अतिरिक्त भुर्दंडही वाहनचालकांवर पडणार आहे. हे दर किती असणार आहेत त्यासंबंधी चर्चा सुरू असून मुंबई आणि पुण्यापेक्षा ठाण्यातील टोइंग कारवाईचा दंड कमीच असेल, असे पाटील यांनी सांगितले.

कंत्राटदारांना सूचना

ठाण्यात टोइंगवर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून अत्यंत चुकीच्या पद्धतीने वाहन उचलण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी टोइंग कंत्राटदारांची बैठक घेऊन त्यांना जानेवारी महिन्यापासून अटी आणि शर्तीचे पालन करावे लागणार असल्याच्या सूचना दिल्या आहेत. यात  टोइंग वाहनावर भोंगे बसविणे, वाहन उचलताना चित्रीकरण करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे कंत्राटदारांच्या खर्चामध्येही वाढ होणार आहे. त्यामुळे आता वस्तू आणि सेवा कराची आकारणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

सध्याचे टोइंग दर

वाहन                       दर (रु)

दुचाकी,

रिक्षा                        १००

कार जीप                  २००

टॅक्सी                        १५०

टेम्पो, लहान बस        ४००

अवजड वाहने            ६००