News Flash

‘जल स्वयंपूर्ण’ होण्यासाठी त्रिवेणी गार्डन सोसायटीचा अभिनव प्रयोग

पाणीकपातीमुळे कल्याण-डोंबिवली शहरांना तुटपुंजा पाणीपुरवठा होत आहे.

कल्याणमधील त्रिवेणी गार्डन सोसायटीच्या आवारातील जलसंचय योजना. 

१० लाख लीटर पाणी मुरविण्याचा सदस्यांचा निर्धार

कल्याणमधील त्रिवेणी गार्डन सोसायटीने (ए टाइप) येणाऱ्या काळातील पाण्याचे दुर्भिक्ष विचारात घेऊन सोसायटीच्या आवारात जलसंचय योजना (रेन वॉटर हार्वेस्टिंग) राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून १० लाख ५५ हजार लिटर पाणी जमिनीत मुरविण्यात येणार आहे. अनेक र्वष आपण नैसर्गिक स्रोतांमधून बेसुमार पाणी उपसा केला, तेच पाणी आता निसर्गाला परत करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे सोसायटीने जलसंचय योजना राबविण्याचा निर्णय घेतला, असे सोसायटीचे अध्यक्ष विजय सूचक यांनी सांगितले.

पाणीकपातीमुळे कल्याण-डोंबिवली शहरांना तुटपुंजा पाणीपुरवठा होत आहे. आठवडय़ातून तीन दिवस पाणी येत असल्याने रहिवाशांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. त्रिवेणी गार्डन सोसायटीला पाणीटंचाईची समस्या भेडसावत होती. या सोसायटीतील (ए टाइप) रहिवाशांनी पाणीटंचाईवर उपाय म्हणून सोसायटीच्या आवारात आणखी एक वाढीव तळटाकी बांधण्याचा निर्णय घेतला. महापालिकेकडून पुरेसे पाणी आले तरच तळटाकी भरेल अन्यथा ती टाकी कोरडीठाक राहणार, असाही विचार सदस्यांनी केला.

तळटाकी बांधण्यापेक्षा ‘जलसंचय’ योजना राबविली तर जमिनीत पाणी मुरेल. भूजल पातळी वाढल्याने कूपनलिकेला पुरेसे पाणी राहील, असा विचार सोसायटीच्या संचालक मंडळाने केला. त्यानंतर सदस्यांनी नवीन तळटाकी बांधण्यापेक्षा जलसंचय योजना राबविण्याच्या प्रकल्पाला तात्काळ मंजुरी दिली. जलसंचय योजनेतील तज्ज्ञ केदार पोंक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिवेणी गार्डन सोसायटीच्या आवारात शास्त्रोक्त पद्धतीने जलसंचय प्रकल्प उभारण्यात आला आहे. अशा प्रकारची यशस्वीरीत्या जलसंचय योजना राबविणारी शहरातील ही पहिली सोसायटी आहे, असा दावा सदस्यांनी केला. यापुढील काळात धरणातील पाणीसाठा, पालिकेच्या पाण्यावर विसंबून न राहता, प्रत्येक सोसायटी, रहिवाशाने स्वत:हून पाण्याचे नवीन स्रोत शोधणे, भूजल पातळी वाढविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असा विचार  सदस्यांनी केला .केवळ जलसंचय योजना पूर्ण करून सदस्य थांबणार नाहीत तर या प्रकल्पात जल शुद्धीकरण प्रकल्प बसवून, जलसंचय योजनेचे पाणी पिण्यासाठी वापरण्याचा मानस आहे.येत्या ऑक्टोबपर्यंत शुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याचा विचार आहे, असे अध्यक्ष सूचक यांनी सांगितले.

जलसंचय प्रकल्प

  • २४० चौरस फुटांच्या तळटाकीचे बांधकाम.
  • या टाकीतून १० लाख ५० हजार लिटर पाणी जमिनीत मुरवण्याची क्षमता.
  • पाण्याचा एक थेंब फुकट जाऊ नये म्हणून टाकीच्या चारही बाजूने विटांना छिद्रे.
  • तळटाकी पूर्ण भरल्यानंतर ते पाणी लगतच्या कूपनलिकेत पुनर्भरणाची व्यवस्था.
  • तळटाकीत शुद्ध पाण्यासाठी रेती, खडी, कपची खडी, कोळसे यांचा थर.
  • योजनेतील पाणी पिण्यासाठी वापरता यावे, म्हणून जल शुद्धीकरण प्रकल्प
  • त्रिवेणी गार्डन सोसायटी पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2016 1:29 am

Web Title: water saving project in kalyan
टॅग : Kalyan
Next Stories
1 कॉलेजच्या कट्टय़ावर : जीवनोपयोगी संशोधनावर भर
2 खेळ मैदान : शरीरसौष्ठव स्पर्धेत मावळी मंडळ अव्वल
3 सृजनाची फॅक्टरी : उगवतीच्या लाटेची पैलतीराशी गाठभेट
Just Now!
X