जयेश सामंत

निवडणुकीत शिवसेनेशी युतीसाठी तडजोड म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरीतून रायगड जिल्ह्यातील रोहा येथे हलवलेला ‘नाणार’ प्रकल्प बारगळण्याचे संकेत आहेत.

या प्रकल्पासाठी सिडकोमार्फत आरक्षित जमिनीपैकी पाच हजार एकरच्या विस्तीर्ण क्षेत्रात औषध निर्माण उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रोह्यतील ‘नाणार’साठीचे इतरही क्षेत्र अनारक्षित करण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

सौदी अरेबियाची अराम्को, तसेच इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्थान पेट्रोलियन आदींच्या साहाय्याने सुमारे तीन लाख कोटींचा भव्य तेलशुद्धीकरण प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्य़ात राजापूर तालुक्यातील नाणार येथे उभारण्यात येणार होता. परंतु, शिवसेनेने या प्रकल्पाला टोकाचा विरोध केला. तसेच भाजपशी युती करताना हा प्रकल्प रद्द करण्याची अट शिवसेनेने घातली. ती मान्य करण्यापूर्वीच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहा, अलिबाग, मुरुड तालुक्यांमधील किनारपट्टीवर या प्रकल्पासाठी पर्यायी जागेची सिडकोमार्फत निवड केली. या गावांमधील क्षेत्र नवनगर म्हणून अधिसूचित करून सिडकोला विकास प्राधिकरणाचे हक्क बहाल करण्यात आले. या एकात्मिक औद्योगिक वसाहतीसाठी रोहा तालुक्यातील २१, अलिबाग ८, मुरुड १० आणि श्रीवर्धन तालुक्यातील एका गावाची निवड करण्यात आली. या प्रकल्पासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चाही रंगली होती.

या गावांमधील कार्यरत असलेल्या सर्व नियोजन यंत्रणांचे अधिकार रद्द करून ते सिडकोला प्रदान करण्यात आले. यापैकी काही गावांमधील जमीन औषध निर्माण उद्यानासाठी वर्ग करण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. उर्वरित जमिनीवर तेलशुद्धीकरण प्रकल्प उभा राहील का, याबाबत संभ्रम वाढला आहे. सिडकोने उर्वरित जमीन अनारक्षित करण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले. या विषयाची राजकीय संवेदनशीलता लक्षात घेता सर्व संबंधित यंत्रणांनी अधिकृ त भाष्य करण्यास नकार दिला. सिडकोचे नवे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या जनसंपर्क विभागाने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.