मध्य रेल्वेवर महिला स्वच्छतागृहांची वानवा

मध्ये रेल्वेच्या प्रवाशांना स्मार्ट सुविधा पुरविण्याची गोष्ट राहू द्या, स्थानकांमधील स्वच्छतागृहांची साधी स्थिती रेल्वे प्रशासनाला सुधारता आलेली नाही. स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण यांचा मोठा गाजावाजा झाला. परंतु रेल्वेच्या हद्दीत बकालपणा कायम आहे. ठाणे आणि त्यापुढील रेल्वे स्थानकामधील स्वच्छतागृहांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. ठाणे, डोंबिवली आणि कल्याण ही सर्वाधिक गर्दीची स्थानके वगळता अन्य स्थानकांत महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांची वानवा आहे.

ठाणे, डोंबिवली, कल्याण स्थानकांतील स्वच्छतागृह भाडेतत्त्वावर देण्यात आली आहेत. स्वच्छतागृहांच्या वापरासाठी पाच रुपयांची आकारणी केली जाते. तरीही स्वच्छतागृहे वापरण्यालायक नसल्याच्या तक्रारी महिला प्रवाशांकडून वारंवार केल्या जातात.

महत्त्वाची स्थानके वगळता कळवा, दिवा, मुंब्रा, कोपर या स्थानकांमधील स्वच्छतागृहांच्या एकूण परिस्थितीमुळे महिला प्रवाशांकडून त्याचा वापरच केला जात नसल्याचे पाहायला मिळत आहे. कळवा स्थानकामध्ये गेले अनेक दिवस स्वच्छतागृहाची दुरुस्ती सुरू असल्याने महिलांना वापरासाठी स्वच्छतागृहाची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. मुंब्रा स्थानकातील स्वच्छतागृह हे फलाटाच्या बाहेरील बाजूस बांधण्यात आले आहे. अनेकदा या स्वच्छतागृहांचे दार बंद असल्याच्या तक्रारी या स्थानकातून प्रवास करणाऱ्या महिलांकडून करण्यात आल्या आहेत. कोपर स्थानकाच्या फलाटावर मुंबई दिशेकडील कोपऱ्यात असलेल्या स्वच्छतागृहाच्या आसपास एकही महिला फिरकत नाही. रात्रीच्या वेळेत या स्वच्छतागृहांमध्ये पूर्णपणे अंधार असतो. स्वच्छतागृह स्थानकाच्या अगदी कोपऱ्यावर असल्याने आम्हाला तेथे जाण्यासही भीती वाटते, असे स्थानकातील महिला प्रवासी सांगतात. दिवा-वसई शटल थांबणाऱ्या उन्नत कोपर स्थानकावरून अनेक प्रवासी या स्थानकावर येतात. पुरुष प्रवासी हमखास उघडय़ावर मूत्रविसर्जन करताना पाहायला मिळतात. कोपर स्थानकात महिला प्रवाशांची मात्र चांगलीच गैरसोय होते.

विठ्ठलवाडी, वांगणी या स्थानकांवर असलेल्या स्वच्छतागृहांमध्ये पाणी नसणे, दरवाजा नसणे अशा समस्यांना महिला प्रवाशांना तोंड द्यावे लागत आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात असलेल्या स्वच्छतागृहाच्या खिडक्या तुटलेल्या आहेत. अत्यंत दुर्दशेत असलेल्या स्वच्छतागृहाच्या दरुगधीमुळे या स्वच्छतागृहाच्या आसपास येणाऱ्या डब्यात कोणताच प्रवासी चढत नसल्याचे येथील महिला प्रवासी सांगतात. अंबरनाथ रेल्वे स्थानकात उपलब्ध असणाऱ्या एकमेव स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे गेले तीन महिने स्थानकात कोणतीही सुविधा नाही. काही महत्त्वाची स्थानके वगळता मध्य रेल्वेच्या सर्वच स्थानकांमधील महिला स्वच्छतागृहांची परिस्थिती थोडय़ा-अधिक प्रमाणात सारखीच आहे.

तुटलेल्या खिडक्या, दरवाजे, दरुगधी, अस्वच्छता, पाण्याचा अभाव, असुरक्षित वातावरण आणि महिला स्वच्छतागृहांच्या अशा गैरसोयीत महिला प्रवासी अजून किती दिवस प्रवास करणार, असा सवाल संतप्त महिला प्रवाशांकडून विचारला जात आहे.आजकाल महिला सक्षमीकरण, महिलांचे आरोग्य याचा अट्टहास अनेकांकडून केला जात असला तरी रेल्वे प्रशासन महिला प्रवाशांना स्वच्छतागृहासारखी किमान सुविधा पुरवण्यासदेखील अपुरी पडत असल्याचे एकंदर चित्र प्रत्येक रेल्वे स्थानकात पाहायला मिळत आहे.

महिलांना स्वच्छतागृहांसारख्या महत्त्वाच्या सुविधा रेल्वे प्रशासनाकडून पुरवल्या जात नाहीत. रेल्वेतील महिला स्वच्छतागृहांच्या दुर्दशेसाठी अनेकदा स्वच्छता कर्मचारी उपलब्ध नाही, ठेकेदार उपलब्ध नाही, अशी कारणे रेल्वे प्रशासनाकडून दिली गेली आहेत. अनेक स्थानकांमध्ये स्वच्छतागृह उपलब्ध असूनही स्वच्छतागृहांच्या परिस्थितीमुळे प्रवाशांकडून त्यांचा वापर केला जात नाही.

लता अरगडे, प्रवासी संघटना