कल्याण – कल्याण पूर्व काटेमानिवली भागात एका निर्माणाधिन इमारतीच्या बांधकाम साहित्याचा भार एका सोसायटीच्या संरक्षक भिंतीवर येऊन सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक संरक्षक भिंत कोसळली. या भिंतीलगत असलेल्या सुमारे १४ दुचाकींचा ढिगाऱ्याखाली चुराडा झाला. याप्रकरणी एका गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिका विरुध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
काटेमानिवलीतील योगेश्वर गृहसंकुलाच्या बाजुला एका नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठीचे रेती, विटा, खडी आणि इतर बांधकाम साहित्य विकासकाने योगेश्वर संकुलाच्या संरक्षक भिंतीलगत टाकले आहे. या कामाच्या ठिकाणी अवजड मालवाहू वाहनांची वाहतूक सुरू होती. अशाप्रकारे आमच्या संरक्षक भिंतीलगत बांधकाम साहित्य टाकू नका. त्यामुळे संरक्षक भिंती कोसळण्याची शक्यता आहे, असे योगेश्वर संकुलातील पदाधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिकाला अनेक वेळा पत्रव्यवहार करून कळविले होते. त्याची दखल घेण्यात येत नव्हती, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
पाऊस सुरू असताना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास बांधकाम साहित्याच्या वजनाचा भार योगेश्वर संकुलाच्या संरक्षक भिंतीवर आला. अचानक सोसायटीच्या संरक्षक भिंतीचा सुमारे १५ फूट लांबीचा भाग कोसळला. या भिंतीलगत रस्त्यावर परिसरातील नागरिकांनी आपल्या सुमारे १४ दुचाकी उभ्या करून ठेवल्या होत्या. या सर्व दुचाकी ढिगाऱ्याखाली अडकल्या. या भिंतींच्या बाजुला मोटारी उभ्या होत्या, त्या सुदैवाने ढिगाऱ्या खाली आल्या नाहीत, असे स्थानिकांनी सांगितले.
काटेमानिवलीतील या रस्त्यावरून दिवसभर नागरिक, वाहनांची वर्दळ असते. रात्रीची वेळ असल्याने या रस्त्यावर नागरिकांची वर्दळ नव्हती. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती असे या भागातील नागरिकांनी सांगितले. मध्यरात्रीच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. त्यानंतर परिसरातील नागरिक भीतीने जागे झाले. त्यांना आपल्या घराजवळील संरक्षक भिंत कोसळल्याचे समजले.