नागरीकरणाच्या रेटय़ात कल्याण-डोंबिवली परिसरात काही प्रमाणात का होईना, निसर्ग शिल्लक असल्याचा पुरावा नुकत्याच झालेल्या पक्षी नोंद स्पर्धेतील निष्कर्षांतून मिळाला आहे. कावळा, चिमणी, पोपट, कबूतर या नेहमीच्या पक्ष्यांप्रमाणेच दुर्मीळ मानला जाणारा दुर्मीळ पांढरा करकोचाही डोंबिवलीत असल्याची नोंद या स्पर्धेनिमित्त झाली आहे.
ठाणे-रायगड जिल्ह्य़ातील पक्षिमित्र संघटना आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली (पश्चिम) यांच्या संयुक्त विद्यमाने अलीकडेच पक्षी निरीक्षण स्पर्धा घेण्यात आली. त्यात स्पर्धकांनी घेतलेल्या नोंदीतून १६० प्रकारचे पक्षी कल्याण-डोंबिवली परिसरात आढळून आले आहेत. या स्पर्धेत ४५ संघटनांचे १७० स्पर्धक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पाचवी ते दहावीपर्यंतच्या ३० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. विद्यार्थ्यांसोबतच पालकांनीही पक्षी निरीक्षणाचा आनंद घेतला. नागरिकांनी भल्या पहाटे उठून जवळील पक्षीनिरीक्षण स्थळांना भेटी दिल्या. त्यात नदी, खाडी किनारा, बंदरे, खुरटी वने, तलाव, गवताळ प्रदेश, खडकाळ प्रदेश, दाट वनराई, डोंगर आदी भागाचा समावेश होता. या भागात स्थानिक पक्षांसोबतच स्थलांतरित परदेशी पक्षीही वास्तव्यासाठी येतात. दरवर्षी पाच ते सहा बदके आणि किनाऱ्यावरील पक्षी स्थलांतरित होऊन कल्याण डोंबिवलीच्या खाडी किनाऱ्यावर संपूर्ण हिवाळा व्यतीत करतात. स्पर्धेत १६० च्या वर विविध पक्ष्यांची नोंद घेण्यात आली.
एकंदरीत संवर्धन आणि पक्षीनिरीक्षणाबद्दल आवड निर्माण होण्याच्या हेतूने केलेला हा कार्यक्रम यशस्वी ठरल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.
मोठय़ा गटात लघु कर्ण घुबड संघाने १५३ प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद करीत पहिला क्रमांक पटकाविला. संघात श्रुती हेगडे, कुलदीप म्हात्रे, प्रतीक्षा ठाकूर, प्रथमेश गुर्जरपाध्ये आणि मधुर केतकर यांचा समावेश होता. ‘आजचा विशेष पक्षी’ याचे पारितोषिकही याच संघाला मिळाले. त्यांना मिळालेला दुर्मीळ पक्षी म्हणजे पांढरा करकोचा. महाराष्ट्रात या करकोच्याच्या अतिशय कमी नोंदी सापडल्या आहेत. मुंबई परिसरात तो अतिदुर्मीळ आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या पक्ष्याच्या चार नोंदी मिळाल्या असून त्यात एक भिगवण येथे तर ३ डोंबिवलीत आढळल्या आहेत.
पाचवी ते दहावी या शालेय गटात नीलकंठ संघाने बाजी मारली. वेदान्त कासंबे यांच्या या संघाने ९२ पक्ष्यांची नोंद घेतली. ११ वी ते १५ वी या दुसऱ्या गटात स्वर्गीय नर्तक या गटाने बाजी मारली. अद्वैत राईलकर याच्या नेतृत्वाखाली या संघाने १०९ पक्ष्यांची नोंद घेतली, तर खुल्या गटामध्ये शिक्रा संघाने बाजी मारली. प्रसाद खाले यांच्या मार्गदर्शनाखाली गटाने १३८ पक्ष्यांची नोंद घेतली. पक्षी निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली परिसरात २५० हून अधिक प्रकारचे पक्षी आढळतात.
ठाणे आणि रायगड जिल्हा पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष प्रथमेश देसाई आणि रोटरी क्लब डोंबिवली पश्चिमचे अध्यक्ष राजीव मोहिते, परीक्षक व पक्षीतज्ज्ञ पराग दामले, प्रशांत पाटील, किरण कदम ,स्वप्निल कुलकर्णी, प्रतीक प्रभू,अजिंक्य ब्रीद आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिमांशू टेंभेकर यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jan 2016 रोजी प्रकाशित
डोंबिवली परिसरात १६० जातींच्या पक्षांचे वास्तव्य!
दुर्मीळ मानला जाणारा दुर्मीळ पांढरा करकोचाही डोंबिवलीत असल्याची नोंद या स्पर्धेनिमित्त झाली आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 28-01-2016 at 03:09 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 160 types of bird species lived in dombivli area