ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात दिवाळी काळात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवा आणि ध्वनी प्रदुषणात वाढ झाल्याचे समोर आले असतानाच, त्यापाठोपाठ गेल्या चार दिवसांत म्हणजेच दिवाळी कालावधीत संपुर्ण शहरात एकूण २५ आगीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नसली तरी काही ठिकाणी मात्र वित्तहानी झालेली आहे. मात्र, यंदा मागील वर्षीच्या तुलनेत आगीच्या घटना कमी असल्याचे दिसून आले.
ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात येते. दिवाळीनिमित्ताने सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. मागीलवर्षी प्रमाणेच यंदाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर फटाके वाजवले. ठाणे पालिका प्रशासनाकडून दिवाळी काळात हवा गुणवत्तेची तपासणी करण्याबरोबर ध्वनी पातळीचे मापन करण्यात येते. यंदाच्या तपासणीत दिवाळीच्या काळात ध्वनी आणि वायू या दोन्हीत वाढ नोंदवली गेली आहे.
त्याचप्रमाणे शहरात २५ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. सोमवारी २० ऑक्टोबरला नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी शहरात ५ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर २१ नोव्हेंबरला लक्ष्मीपुजनाच्या दिवशी ४ ठिकाणी, २२ ऑक्टोबरला दिपावली पाडव्याच्या दिवशी ६ आणि २३ ऑक्टोबरला भाऊबीजच्या दिवशी १० अशा एकूण २५ ठिकाणी आग लागल्या घटना घडल्या आहेत. शहरातील हिरानंदानी इस्टेट, कोलशेत, वर्तक नगर, सावरकर नगर, कळवा, मुंब्रा, माजिवडा आणि ढोकाळी या परिसरात घटना नोंदवल्या गेल्या असून या घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मात्र आगीत किरकोळ साहित्य, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, छतावरील ताडपत्री जळून खाक झाले आहे.
मागीलवर्षी दिवाळी काळात शहरात ३८ ठिकाणी आग लागल्याची घटना घडली होती. यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आगीच्या घटनेत घट झाल्याचे दिसून येत आहे.
आगीच्या घटना कुठे घडल्या
कोलशेतमधील लोढा अमरा या उंच इमारतीला लावलेल्या सेफ्टी नेटला आग लागली होती. सावरकरनगर येथील शिवानंद अपार्टमेंटमध्ये घराच्या बाल्कनीत ठेवलेल्या लाकडी कपाट आणि कपड्यांना आग लागली होती. कळवा येथील सायबा हॉलमधील डेकोरेशन साहित्य, चार एसी, लाकडी टेबल, कार्पेट व मंडप सामग्री जळून खाक झाले. ढोकाळी येथील रुणवाल आयरीन संकुलात बंद घरात ठेवलेले रद्दी कागद, प्लास्टिक व विविध साहित्य पेटले. वागळे इस्टेट येथे गॅरेजला आग लागली होती. मुंब्रा येथे एका मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला आग आली होती. खोपट येथे एका दुकानाच्या छतावरील प्लास्टिक ताडपत्रीला आग लागल्याचे समोर आली होती.
दिवाळीत प्राप्त झालेल्या आगीच्या तक्रारी (२०१६-२०२५)
वर्ष – आगीच्या घटना
२०१६ – ३१
२०१७ – २०
२०१८ – ५३
२०१९ – २१
२०२० – १६
२०२१ – ३३
२०२२ – २७
२०२३ – ४७
२०२४ – ३८
२०२५ – २५
