विनामुखपट्टी, बेकायदा सोहळे आणि दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई

उल्हासनगर : टाळेबंदी असूनही बेकायदेशीरीत्या लग्नसोहळे, कार्यक्रम करणारे, छुप्या पद्धतीने दुकाने सुरू ठेवून विक्री करणारे आणि मुखपट्टीशिवाय वावरणाऱ्या ८ हजार ३७२ जणांकडून गेल्या तीन महिन्यांत तब्बल ३४ लाख ८५ हजार ९९ रुपये दंड आकारण्यात आला आहे. उल्हासनगर महापालिका प्रशासनाने फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासून ही कारवाई केली असून इतका दंड वसूल केल्यानंतरही शहरात नियम मोडणाऱ्या नागरिकांची संख्या कायम असल्याचे दिसून आले आहे.

व्यापारी शहर म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगर शहरात टाळेबंदीची अंमलबजावणी करण्यात सातत्याने पालिका आणि पोलीस प्रशासनाला अपयश येते आहे. अत्यंत दाटीवाटीचा प्रदेश, गल्लीबोळांमध्ये असलेली दुकाने आणि अरुंद रस्त्यांमुळे पोलिसांनाही गस्त घालणे अवघड होते. याचाच फायदा घेऊन गेल्या काही दिवसांमध्ये उल्हासनगर शहरात छुप्या पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्याचे प्रकार समोर आले आहेत. नुकत्याच एका दुकानातून तब्बल ८० ग्राहक बाहेर पडत असल्याची चित्रफीत प्रसारित झाली होती. तर शहरात अनेक ठिकाणी नागरिकही मुखपट्टीशिवाय वावरत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत. गेल्या तीन महिन्यांत उल्हासनगर महापालिका प्रशासनातर्फे अशा नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत तब्बल ३४ लाख ८५ हजार ९९ रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

उल्हासनगर महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या या माहितीनुसार शहरात २३ फेब्रुवारी ते ११ मे या काळात आतापर्यंत ७ हजार ४६१ नागरिकांवर मुखपट्टी नसल्याने कारवाई करण्यात आली आहे. या नागरिकांकडून १५ लाख ३१ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यात सर्वाधिक कारवाई मार्च महिन्यात करण्यात आली असून या महिन्यात ४ हजार १९५ नागरिकांवर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याकडून ७ लाख ६५ हजारांची वसुली करण्यात आली.

छुप्या पद्धतीने दुकाने सुरू ठेवून खरेदी विक्री करणाऱ्या एकूण ८६८ दुकानदारांवर या काळात कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १९ लाख ३ हजार  ७९९ रुपये दंडाच्या रूपाने वसूल करण्यात आले आहेत. टाळेबंदी घोषित केल्याच्या एप्रिल महिन्यात दुकानदारांकडून सर्वाधिक नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. या महिन्यात ११ लाख ७० हजार रुपयांचा दंड फक्त एका महिन्यात वसूल करण्यात आला.

४३ सभागृहांवर नियमभंगाची कारवाई

उल्हासनगर शहरात लग्नसोहळे, कार्यक्रमांमध्ये अंतर नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या तीन महिन्यांत शहरात ४३ सभागृहांवर नियमभंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात ही कारवाई करण्यात आली असून यात ५० हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आल्याची माहिती प्रभाग समिती अधिकारी गणेश शिंपी यांनी दिली आहे.