ठाणे सेंट्रल जेलमध्ये कार्यरत असलेल्या चार पोलिसांना करोना व्हायरसची बाधा झाली आहे. तुरूंग महानिरीक्षक दीपक पांड्ये यांनी रविवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ‘ठाणे सेंट्रल जेलमध्ये कार्यरत असलेल्या चार पोलीस हवालदारांना करोनाचा संसर्ग झाला आहे. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तसेच त्या चौघांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे.’

ठाणे जिल्ह्यात रविवारी ९९२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे करोना रुग्णांची एकूण संख्या आता २१ हजार ५५८ इतकी झाली आहे. तर, रविवारी ६१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ७४५ इतका झाला आहे. कल्याण-डोंबिवलीत २५४, ठाणे शहरात १६४, नवी मुंबईत १५४, भिवंडीत १७०, अंबरनाथमध्ये १९, उल्हासनगरमध्ये ५१, बदलापूरमध्ये २५, मीरा-भाईंदरमध्ये १०६ ठाणे ग्रामीणमधील ४९ रुग्णांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात मुंबई आणि उपनगरे तसेच पुणे, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर आणि नागपूर या जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. राज्यात रविवारी करोनाच्या ३,८७० रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्याची एकूण रुग्णसंख्या १,३२,०७५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत राज्यभरात १०१ करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा ६,१७० झाला आहे. गेल्या २४ तासांत १,५९१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत ६५,७४४ रुग्ण बरे झाले असून, ६० हजार १४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.