ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवली पालिकेतील शिवसेनेचे सुमारे ४० हून अधिक नगरसेवक गुरुवारी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन निवासस्थानी दाखल झाले. या नगरसेवकांसोबतच्या एक तासाच्या बैठकीनंतर या नगरसेवकांनी आम्ही शिंदे गटात सामील होत असल्याचे जाहीर करताच मुख्यमंत्री निवासस्थानात जल्लोष करण्यात आला. या नगरसेवकांच्या शिंदे गटात सामील होण्याच्या निर्णयाने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीत मोठे भगदाड पडले आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेत शिवसेनेचे कट्टर ५३ नगरसेवक आहेत. पालिकेतील सत्तेसाठी पाच वर्षापूर्वी शिवसेनेला अपक्ष गटातील चार नगरसेवकांनी साथ दिली होती. सेनेचे स्वीकृत नगरसेवक दोन आहेत. त्यामुळे पालिकेतील शिवसेनेचे संख्याबळ ५९ आहे. या गटातील ४० हून अधिक नगरसेवक गुरुवारी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची शिवसेना सोडून शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला मोठे खिंडार पडले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
bhavana gawali lok sabha marathi news
भावना गवळींची नाराजी मिटली? उद्योगमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांनीही….
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
Hemant Godse still hopeful for Nashik seat It is claimed that Chief Minister is also insistent
नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे अजूनही आशावादी, मुख्यमंत्रीही आग्रही असल्याचा दावा

PHOTOS : शिवसेनेच्या हातून बालेकिल्ला निसटला?; ठाण्यातील ६७ पैकी ६६ नगरसेवक ‘शिंदे’शाहीत

राज्यात सत्तांतर नाट्य सुरू असताना कल्याण डोंबिवलीतील शिवसैनिक, शिवसेना नगरसेवक तळ्यामळ्यात करत होते. काहींनी गुप्तपणे ठाणे, मुंबईत जाऊन शिंदे, ठाकरे गटाच्या गुप्त भेटी घेतल्या होत्या. उघडपणे आपण कोणत्या गटात हे शिवसैनिक, नगरसेवक सांगण्यास नकार देत होते. निष्ठावान शिवसैनिकांच्या कल्याण, डोंबिवलीतील बैठकीला जे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित राहत होते. तेच पुन्हा शिंदे गटाच्या बैठकीला हजर राहत होते. त्यामुळे शिवसेना नगरसेवक, त्यांचे पदाधिकारी कोणत्या गटाचे असा संभ्रम शिवसैनिक, लोकांमध्ये निर्माण झाला होता. हा संभ्रम शिंदे यांच्या बरोबरीच्या भेटीने संपुष्टात आला आहे.

शिवसेना नगरसेवकांमध्ये राजेश मोरे, दीपेश म्हात्रे, रमेश म्हात्रे, विशाल पावशे, रवी पाटील, नितीन पाटील, रंजना पाटील, छाया वाघमारे, नीलेश शिंदे, जनार्दन म्हात्रे या नगरसेवकांचा सहभाग होता. काही नगरसेवक बाहेरगावी येऊ शकले नाहीत, असे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी सांगितले. खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांची आखणी करून हा मोठा गट शिंदे सेनेत दाखल करून घेण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. कल्याण डोंबिवलीतील सर्वच शिवसैनिक शिंदे गटात दाखल होतील, असा विश्वास खा. डाॅ. शिंदे यांना आहे.

कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक रमेश जाधव, सोनारपाडा, डोंबिवलीतील एमआयडीसीतील नगरसेवक शिंदे गटात सामील झालेले नाहीत. कल्याण ग्रामीण शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गेल्या १५ दिवसापूर्वीच उध्दव ठाकरे यांना समर्थन देण्याचा ठराव केल्याने कल्याण ग्रामीण मधील एकही पदाधिकारी यावेळी उपस्थित नव्हता. डोंबिवली, कल्याण मधील प्रत्येक शिवसैनिक, नगरसेवक शिंदे गटात सामील होईल अशी व्युहरचना आम्ही करणार आहोत, असे शिंदे गटातील एका उच्चपदस्थाने सांगितले.

ठाण्यात ६७ पैकी ६६ नगरसेवक एकनाथ शिंदेंसोबत; नरेश म्हस्केंची माहिती

डोंबिवलीतील ज्येष्ठ निष्ठावान शिवसैनिक सदानंद थर‌वळ, तात्यासाहेब माने यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याने ते कोणत्या गटात हा संभ्रम अद्याप कायम आहे. डोंबिवलीतील १९७० ते १९८० च्या दशकातील बहुतांशी आनंद दिघे समर्थक शिवसैनिक हा शिवसेनाप्रमुखांना मानणारा असल्योन तो उध्दव ठाकरे यांच्या गटात राहण्याची शक्यता शिवसेनेतील जुने जाणकार व्यक्त करतात. कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील ४० हून अधिक नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्याने उध्दव ठाकरे शिवसेनेला हा मोठा झटका मानला जातो. स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामे आणि अन्य कामे करायची असेल तर मातोश्री पेक्षा ठाणे कितीतरी पटीने अधिक सुलभ असा विचार अनेक नगरसेवकांनी करून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते. राज्यातील सत्तेत शिंदे सेनेचा महत्वपूर्ण सहभाग आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने येत्या काळात पालिका निवडणुकीत आपणास कोणतीही बाधा, विघ्न येणार नाही हा दूरगामी बहुतांसी नगरसेवकांनी केला असल्याचे कळते. प्रसारमाध्यमांचा ससेमिरा चुकविणे आणि फुटाफुटी होऊ नये यासाठी मध्यरात्रीची वेळ दल बदल मोहिमेसाठी राबविण्यात आली होती, असे सेनेतील एका या मोहिमेतील आखणीकाराने सांगितले.