ठाणे : जिल्हा महिला बालविकास विभागाच्या उल्हासनगर येथील महिला बालसुधारगृहातून सहा मुलींनी पळ काढल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. यातील चार मुलींचा शोध लागला असून दोन मुली अद्याप बेपत्ता आहेत. तर याच सुधारगृहातून काही महिन्यांपूर्वी आठ मुलींनी देखील सुरक्षा भिंत ओलांडून पळ काढला होता. यामुळे उल्हासनगर येथील या महिला बालसुधारगृहाच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
उल्हासनगर शहरातील तहसीलदार कार्यालयाच्या शेजारी असलेल्या या महिला बालसुधारगृहात अनाथ, भिक्षेकरी तसेच गरज असलेल्या मुलींना आणि विविध गैर प्रकरणातून सुटका करून आणलेल्या अठरा वर्षाखालील मुलींना
आश्रय दिला जातो. या ठिकाणी त्यांची राहण्याची जेवणाची तसेच विविध कायदेशीर गोष्टींबाबत या ठिकाणी त्यांना मदत पुरविली जाते. विविध प्रकरणातून सुटका करून आणलेल्या मुलींना देखील ठेवण्यात येत असल्याने येथील सुरक्षा देखील चोख असते. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये या सुधारगृहात अनेक गैरप्रकार घडत असल्याचे सातत्याने निदर्शनास आले आहे.
गेल्या आठवड्यात या सुधारगृहात राहत असलेल्या सहा मुलींनी सुधारगृह व्यवस्थापनाची नजर चुकवत येथून पळ काढला. याबाबतची माहिती मिळताच जिल्हा महिला बाल विकास विभागाने पोलिसांच्या मदतीने या मुलींची शोध मोहीम राबविली. यातील चार मुलींना शोधण्यात उल्हासनगर पोलिसांना यश आले असून दोन मुली मात्र अद्याप बेपत्ता आहेत.
यातील दोन मुलींपैकी एक मुलगी पश्चिम बंगाल तर एक मुलगी आसाम येथील आहे. मानवी तस्करी प्रकरणातून या मुलींना सोडविण्यात आले होते. यातील दोन मुलींनी पळ काढून आपापल्या राज्यात जात थेट आपले घर गाठले. तर उर्वरित दोन मुली या महाराष्ट्रातील असून त्यांना पुन्हा सुधारगृहात आणण्यात आले आहे. तर दोन मुलींचा अद्यापही शोध लागलेला नाही. तर या ठिकाणी राहायचे नव्हते म्हणून पळ काढला असल्याचे सापडलेल्या मुलींनी पोलीस चौकशी दरम्यान सांगितले.
बालसुधारगृह कायम वादात
उल्हासनगर येथील हे महिला बालसुधारगृह कायम वादात सापडले आहे. काही महिन्यांपूर्वी या सुधारगृहाची सुरक्षा भिंत ओलांडून आणि येथील लोखंडी गज वाकवून तब्बल आठ मुलींनी याच पद्धतीने पळ काढला होता. मुलींना शोधण्यात पोलिसांना मोठा अवधी लागला होता. या मुली सापडल्यानंतर या सुधारगृहाच्या व्यवस्थापनावर त्यांनी बोट ठेवत येथील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
येथील अस्वच्छता, संबंधित महिला अधिकाऱ्यांकडून अतिरिक्त काम करायला लावणे अशी तक्रार या मुलींनी केली होती. तर एका बालविवाहाच्या प्रकरणातील मुलीला या ठिकाणी आणल्यानंतर तिच्या पालकांनी मुलीला परत आणण्यासाठी सुधारगृह व्यवस्थापनाने लाच मागितल्याचा आरोप देखील केला होता. ही सर्व प्रकरणे ताजी असतानाच आता पुन्हा एकदा या सुधारगृहातून सहा मुलींनी पळ काढला आहे.
या बालसुधारगृहातून पळून गेलेल्या सहा मुलींपैकी चार मुलींचा शोध लागला आहे. दोन मुलींना शोधण्याची मोहीम राबविणे सुरू आहे.
– नमिता शिंदे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, ठाणे</p>