डोंबिवली : डोंबिवली पश्चिम देवीचापाडा येथील सत्यवान चौक ते चकाचक मंदिर दरम्यान असलेल्या २०० मीटर रस्त्यांचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम पाच महिन्यांपासून सुरू आहे. हे काम संथगतीने, निकृष्ट पध्दतीने सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक नगरसेविका, रहिवाशांनी पालिकेकडे केल्या आहेत. या संथगती कामाची सोमवारी पालिकेच्या वरिष्ठ अभियंत्यांनी पाहणी केली. ठेकेदाराने केलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे दिसून आल्याने बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. एस. पाटील यांनी ठेकेदारावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कठोर कारवाईचे आदेश स्थानिक अभियंत्यांना दिले.
देवीचापाडा खाडीजवळ प्रशस्त किनारा, जेट्टी आहे. डोंबिवलीतील रहिवासी सकाळ, संध्याकाळ येथे फिरायला येतात. जैवविविधता येथे आहे. खाडीकिनारी येणारा सत्यवान चौक ते देवीचापाडा स्मशानभूमी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाळय़ात या रस्त्यावरून रहिवाशांना खड्डे, तुंबलेल्या पाण्यातून येजा करावी लागते. या भागातील माजी नगरसेविका सरोज भोईर यांनी नगरसेवक निधीतील ७० लाख रुपयांचा निधी सत्यवान चौक ते चकाचक मंदिर रस्ते कामासाठी प्रस्तावित केला.
प्रशासकीय मंजुरीनंतर उल्हासनगरमधील विनोद हरचंदानी ठेकेदाराला काम देण्यात आले. या रस्ते मार्गातील अतिक्रमणे तत्कालीन साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते, उपअभियंता लीलाधर नारखेडे, साहाय्यक अभियंता महेश गुप्ते यांच्या पथकाने चार महिन्यांपूर्वी तोडली. ठेकेदाराने तात्काळ येथे गटाराची कामे सुरू केली. सुरुवातीला या रस्ते कामाने वेग घेतला. काही ठिकाणी रहिवाशांनी आपल्या घराच्या जागा गटार, रस्ते कामासाठी देण्यास विरोध केला. कमी अंतराचे हे रस्ते काम आता पूर्ण होणे आवश्यक होते. अद्याप गटारे बांधणी सुरू आहे. गटारांची कामे सीमारेषेत नाहीत. गटारावर एक फूट जाडीचा थर (कोपी) टाकण्यात आला आहे. ठेकेदार निकृष्ट काम करतो, अशी पालिकेत पत्रे दिली आहेत. ठेकेदाराकडे मनुष्यबळ नाही. नाका कामगार घेऊन हे काम करतो. दगड फोडण्याची व इतर यंत्रसामग्री ठेकेदाराकडे नाही. पालिकेला कळवूनही त्याची दखल घेतली जात नाही, अशी खंत भोईर यांनी व्यक्त केली. ठेकेदाराला काळय़ा यादीत टाकून अन्य ठेकेदाराकडून उर्वरित काम देण्याची मागणी आयुक्तांकडे करणार आहे, असे भोईर यांनी सांगितले.
सत्यवान चौक रस्त्याचे काम निकृष्ट पध्दतीने सुरू आहे. नगरसेवक निधीमधून हे काम केले जात आहे. ठेकेदार कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे करणार आहे.-सरोज भोईर, स्थानिक नगरसेविका देवीचा पाडा
सत्यवान चौक रस्त्याची सोमवारी पाहणी करण्यात आली. कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने ठेकेदारावर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.-व्ही. एस. पाटील, कार्यकारी अभियंता, बांधकाम, डोंबिवली