डोंबिवली – चालण्याचा ध्यास घेतलेले डोंबिवलीतील ७३ वर्षाचे सेवानिवृत्त बँकर विद्याधर भुस्कुटे आता चौथ्यांदा पदभ्रमणाला निघाले आहेत. यावेळी ते जल, वन संवर्धनाचा संदेश देत महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांमधून तीन हजार १२५ किलोमीटरचे पदभ्रमण करणार आहेत. चार महिने ही पायी भ्रमंती असणार आहे.
३१ ऑक्टोबर रोजी डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुल येथील कॅप्टन विनयकुमार सचान स्मारक येथून सकाळी साडे सात वाजता या पदभ्रमणाचा शुभारंभ होणार आहे. या पदभ्रमणामध्ये २७ जिल्ह्यांमधील दुष्काळग्रस्त, अवर्षणग्रस्त भागांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. आरोहण या संस्थेने या पदभ्रमंतीचे नियोजन केले आहे. या पदभ्रमंतीची माहिती पदभ्रमंतीकार विद्याधर भुस्कुटे, प्रा. विंदा भुस्कुटे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण दुधे, ज्येष्ठ पत्रकार मीना गोडखिंडी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
जल आणि वनसंवर्धना बरोबर देशात, राज्यात शांती, मानवता, भ्रृणहत्या प्रतिबंध, मूल्याधिष्ठीत शिक्षण व्यवस्थेचा संदेश या पदभ्रमंतीमधून विद्याधर भुस्कुटे राज्याच्या विविध भागातील नागरिक, शाळकरी, महाविद्यालयीन मुले, सामाजिक, उपक्रमशील संस्था कार्यकर्ते, पदाधिकारी यांना देणार आहेत. चालुया महाराष्ट्र हे शीर्षक घेऊन ही पदयात्रा काढली जात आहे. ३१ ऑक्टोबरपासून भ्रमंतीला निघालेले भुस्कुटे २४ फेब्रुवारीपर्यंत पुन्हा डोंबिवलीत परतणार आहेत.
ही पदभ्रमंती पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांमधून होणार आहे.
भुस्कुटे यांनी पहिली पदभ्रमंती कश्मीर ते कन्याकुमारी केली. हा प्रवास चार हजार किलोमीटरचा होता. या पदयात्रेची लिम्का बुक, अशिया आणि इंडिया बुक्स ऑफ रेकाॅर्डमध्ये नोंद झाली आहे. दुसरी पदयात्रा अरूणाचल प्रदेशातील किबिथू ते गुजरातमधील पोरबंदर अशी चार हजार किलोमीटरची होती. या पदयात्रेची लिम्का बुकमध्ये नोंद झाली. तिसरी पदयात्रा गुजरातमधील साबरमती आश्रम, अहमदाबाद, शांतिनिकेतन, कोलकत्ता, भारताच्या किनारपट्टी मार्गाने तमीळनाडू ते स्वामी विवेकानंद यांचे स्मारक करण्यात आली. ही पदभ्रमंती चार हजार ७५२ किलोमीटर लांबीची होती. इंडिया बुकमध्ये या भ्रमंतीची नोंद करण्यात आली आहे.
पदभ्रमंतीकार विद्याधर भुस्कुटे यांच्या प्रस्थानाला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे आणि शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.