ठाणे – मुंब्रा येथील अमृतनगर भागात मंगळवारी दुपारी रस्त्यावरून एक चार वर्षाची बालिका आईसोबत जात असताना तिच्या अंगावर परिसरातील एका इमारतीवरून पाळीव श्वान पडला. या अपघातात जखमी झालेल्या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तसेच जखमी झालेल्या श्वानावर उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सना बानो असे या अपघातात मृत पावलेल्या बालिकेचे नाव असून ती मुंब्य्रातील अमृतनगर भागात राहत होती. ती मंगळवारी दुपारी ४.३० वाजता अमृतनगर भागातील रस्त्यावरून आईसोबत जात होती. त्यावेळेस चिराग मेन्शन या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन एक पाळीव श्वान खाली पडला. तो खाली पडत असताना सना हिच्या अंगावर पडला. त्यात डोक्याला मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी तिला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी नेले. तिथे ईसीजी काढून ती मृत झाल्याचे घोषित केले. या अपघातात श्वानही जखमी झाला असून त्याला प्राणी मित्रांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या विचित्र अपघातात बालिकेला आपला प्राण गमवावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>कल्याणमध्ये मोटार चालकाचा दुचाकी स्वाराला ठार मारण्याचा प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाळीव श्वान अंगावर पडून बालिकेचा मृत्यु झाला आहे. याप्रकरणी तिच्या आईचा सविस्तर जबाब घेण्यात आला असून तिच्या आईने कोणाविरुद्धही तक्रार किंवा संशय व्यक्त केलेला नाही. तसेच या पाळीव श्वानाच्या मालकाने महापालिकेकडून श्वान पाळणे बाबतच्या परवानगी घेतली आहे किंवा नाही, याच्या चौकशीसाठी पालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली.