कल्याण : कल्याण पश्चिमेतील बारावे गाव हद्दीतील शिवमंदिर परिसरात कचराकुंडी जवळ एक स्त्री जातीचे दोन दिवसांचे जीवंत अर्भक आढळून आले. खडकपाडा पोलीस ठाण्यातून माहिती मिळाल्यानंतर रुक्मिणीबाई रुग्णालयातील प्रशासनाने हे अर्भक ताब्यात घेतले आहे. या बालकाची प्रकृती स्थिर आहे. हे बालक बालरोग तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल, असे कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. समीर सरवणकर यांनी माध्यमांना सांगितले.
या बालकाचे वजन दोन किलोग्रॅम आहे. बारावे परिसरातील एका सोसायटीतील दाम्पत्याकडून हे बालक याठिकाणी आणून ठेवले असावे असा संशय पोलिसांना आहे. यापूर्वी असे प्रकार वाढले होते. परंतु, अलीकडे शहराच्या विविध भागात पालिकेकडून स्मार्ट सिटी प्रकल्पातून सीसीटीव्ही कॅमेरे शहराच्या विविध भागात बसविले आहेत. त्यामुळे नको असलेले नवजात बालक रस्त्याच्या कोपऱ्याला, कचराकुंडी किंवा झाडाखाली गुपचूप आणून ठेवले तर याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल केला जातो. हा गुन्हा करणारी व्यक्ती तपास करताना सापडली तर त्याच्यावर गुन्ह्याचा दोषारोप पोलिसांकडून ठेवण्यात येतो
आता शहराच्या विविध भागात पालिकेकडून सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. आपणास नको असलेले बालक आपण घर परिसरातील कचराकुंडी, झाड, झुडपांच्या परिसरात ठेवले तर आपण त्या कॅमेऱ्यातील चित्रणाच्या माध्यमातून पकडले जाऊ अशी भीती दाम्पत्यांना आहे. त्यामुळे मागील दोन ते तीन वर्षापासून असे सार्वजनिक ठिकाणी अर्भक ठेवण्याचे प्रकार कमी झाले आहेत.
बारावे गाव हद्दीतील शिव मंदिराजवळ एका कचराकुंडी जवळ एका कपड्यात एक स्त्री जातीचे अर्भक टाकण्यात आल्याची माहिती स्थानिकांना मिळाली. याठिकाणी गर्दी जमा झाली. स्थानिकांना हे स्त्री जातीचे अर्भक जीवंत असल्याचे समजले. तातडीने यामधील जागरूक नागरिकांनी खडकपाडा पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ही माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाला देण्यात आली. पालिका रुग्णालयातून तातडीने डाॅक्टर, परिचारिका रुग्णवाहिकेसह बारावे गाव हद्दीत पोहचले. त्यांनी सर्वप्रथम बालकाचा ताबा घेतला. रुग्णालयात नेऊन बालकाला सुस्थितीत केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी बालक सुस्थितीत असल्याचे आणि बालकाचे वय दोन किलोग्रॅम असल्याचे स्पष्ट झाले.
या बालकाला अन्य काही वैद्यकीय उपचारांची गरज आहे का यासाठी हे बालक कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली येथील पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याठिकाणी बालरोग तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली हे बालक ठेवण्यात येणार आहे, असे पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. समीर सरवणकर यांनी सांगितले.