ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका तरुणाने समाजमाध्यांद्वारे शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धमकी देणारा तरुण शिंदे यांच्याच कोपरी-पाचपाखाडी मतदार संघातील असल्याचे समोर आले असून या तरुणाला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. धमकी देण्याचे मागचे कारण अद्याप समजू शकलेले नसून पोलिस त्याचा तपास करित आहेत.

शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा सामना रंगला आहे. दोन्ही गटाच्या समर्थकांकडून एकमेकांवरोधात समाजमाध्यमांवर टिकाटिप्पणी केली जात आहे. असे प्रकार सुरू असतानाच, रविवारी एका तरुणाने समाजमाध्यमांवर एक चित्रफित प्रसारित केली. यामध्ये त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. हि चित्रफित प्रसारित होताच, ठाण्यात शिवसेैनिकांकडून संपात व्यक्त होऊ लागला. वागळे इस्टेट भागातील शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी परेश चाळके यांच्या शिवसैनिकांनी रविवारी रात्री श्रीनगर पोलिस ठाणे गाठले आणि शिंदे यांना धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर परेश चाळके यांची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी हितेश प्रकाश धेंडे (२६) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला.

हे ही वाचा… कल्याण-डोंबिवलीत पाण्याचा ठणठणाट, अमृत जलवाहिनीचे काम सुरू असताना विद्युत वाहिका तुटली

हे ही वाचा… ठाणे : लघुशंका करण्यास मनाई केली म्हणून मारहाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हितेश हा वागळे इस्टेट येथील वारळीपाडा परिसरात राहतो. हा परिसर शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदार संघात येतो. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी हितेशचा शोध सुरू केला होता. दरम्यान, सोमवारी सकाळी पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली. त्याने असे कृत्य का केले, हे अद्याप समजू शकलेले नसून पोलिस त्याचा तपास करित आहेत. या संदर्भात वागळे परिमंडळाचे पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी धमकी देणाऱ्या तरुणास अटक केल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. तसेच त्याने असे कृत्य का केले, हे अद्याप समजू शकलेले नसून त्याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.