Thane News : ठाणे : घोडबंदर मार्गावरील नागलाबंदर सिग्नल भागात एका खासगी बसगाडीचा भीषण अपघात झाला आहे. बसगाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसगाडी येथील दुभाजकाला तसेच एका दुचाकीला धडकली. या अपघातात दुचाकीस्वार आणि दुचाकीच्या मागे बसलेली महिला जखमी झाली असून असून त्यांना उपाचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांनी बसगाडी चालक जसवंत सिंग शांतु छावडा (४०) याला ताब्यात घेतले आहे.

रितेश छेडा (२४) आणि रेवती यादव (२८) असे जखमींची नावे आहेत. यातील रितेश याच्या हाताला दुखापत झाली असून रेवती हिला डोक्याला मार लागला आहे. घोडबंदर मार्गावरून हजारो अवजड वाहने, बसगाड्या वाहतुक करतात. गुजरातमधून ठाणे, भिवंडी, मुंबई, नवी मुंबई येथील वाहन चालकांसाठी देखील हा मार्ग महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे खासगी बसगाड्यांची देखील वाहतुक या मार्गावर अधिक असते. परंतु रस्त्यांची दुरुस्ती, वाहतुक कोंडी अशा विविध कारणांमुळे घोडबंदर मार्गावर प्रवास जीकरीचा झाला आहे. त्यात या मार्गावर वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चार आणि कासारवडवली ते गायमुख या मेट्रो चार अ प्रकल्पाची कामे सुरु आहेत. त्यामुळे मुख्य मार्गिका अत्यंत अरुंद झाली असून कोंडीत भर पडते. रस्त्यावर देखील ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहेत. सेवा रस्ता आणि मुख्य मार्गाच्या जोडणीचे काम देखील सुरु असल्याने कामे केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे. आता अपघात सत्र देखील कायम असल्याचे चित्र दिसून येते.

अपघात कसा झाला..

गुजरात येथील गांधीनगर भागातून सुटलेली बसगाडी घोडबंदरहून भिवंडीच्या दिशेने वाहतुक करत होती. बसगाडीमध्ये ३० प्रवासी होते. ही बसगाडी सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास नागलाबंदर सिग्नल परिसरात आली असता, बसगाडीवरील चालक जसवंत याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बसगाडीची धडक सिग्नलजवळील दुभाजकाला बसली. सिग्नल परिसरात दुचाकी उभी होती. या दुचाकीला देखील बसगाडीने धडक दिली आहे. यात दुचाकीस्वार रितेश आणि त्याच्या मागे बसलेली रेवती यांना दुखापत झाली. त्यांच्या दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती ठाणे वाहतुक पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रितेश आणि रेवती यांना उपचारासाठी कासारवडवली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर प्रवासी या घटनेत सुखरुप असल्याचे कळते आहे. याप्रकरणात बसगाडी चालक जसवंत याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अपघाताचे नेमके कारण पोलिसांकडून शोधले जात आहे. घटनेनंतर घोडबंदर मार्गावरील अपघातांचे सत्र सुरुच असल्याचे चित्र आहे. या अपघाताची नोंद कासारवडवली पोलीस ठाण्यात केली जात होती.