कल्याण: कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये दहा वर्षापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून काम केलेल्या एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची कल्याणमधील ‘अंतुलें’कडून घर खरेदीत १९ लाखाची फसवणूक करण्यात आली आहे. आठ वर्षापासून घर खरेदीसाठी भरलेल्या पैशात घर नाहीच, पण भरणा केलेली रक्कमही परत मिळत नसल्याने या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने कल्याणमधील ‘अंतुलें’ विरुध्द बाजारपेठ पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
मे २०१८ ते मे २०२५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. एकाच कुटुंबातील सात जणांच्या विरुध्द ही तक्रार करण्यात आली आहे. साठ वर्षाच्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने बाजारपेठ पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की कल्याणमध्ये राहत असलेल्या एका कुटुंबातील सात सदस्यांनी आपणास कल्याण पश्चिमेत आधारवाडी भागात एका विकासकाचा गृह प्रकल्प सुरू आहे. त्या ठिकाणी आपणास स्वस्तात सदनिका घेऊन देतो असे आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेऊन आपण रोखीने आणि धनादेशाव्दारे पारनाका, दूधनाका, आधारवाडी भागात गुन्हा दाखल इसमांच्या ताब्यात घर खरेदीसाठी रकमा दिल्या. अशाप्रकारे २१ लाख रूपयांची रक्कम आपल्याकडून सात जणांनी स्वीकारली.
पैसे दिल्यानंतर आपण सदनिकेचा ताबा मिळण्यासाठी सात जणांकडे तगादा लावला. विविध कारणे त्यांच्याकडून आपणास देण्यात येत होती. घराचा ताबा देणार नसाल तर पैसे परत करा, अशी या पोलीस अधिकाऱ्याची मागणी होती. दरम्यानच्या काळात दोन लाख रूपये गु्न्हा दाखल इसमांनी पोलीस अधिकाऱ्याला परत केले. उरलेले १९ लाख परत मिळण्यासाठी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी प्रयत्नशील होता. हा पोलीस अधिकारी मुंबईत अंधेरी भागात राहतो. पैसे परत मिळण्यासाठी हा अधिकारी मुंबईतून कल्याणला फेऱ्या मारत होता.
आठ वर्ष झाली तरी आपणास घर नाहीच, पण आपले उरलेले १९ लाख रूपये सात इसमांकडून परत केले जात नाहीत. या मंडळींनी कट रचून आपल्याकडून घराच्या नावाखाली पैसे उकळले. आपणास पैसे परत देण्याच्या नावाखाली आपणास धनादेश देण्यात आले. पण त्या धनादेशावर जाणीवपूर्वक बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
धनादेशावरील स्वाक्षरी खरी आहे असे दाखवून ते धनादेश सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला बँकेत वटविण्यासाठी दिले. ते धनादेश बँकेत वटले नाहीत. अशाप्रकारे सात जणांनी फसवणुकीचे एक समान उद्दिष्ट ठेऊन आपला विश्वासघात, फसवणूक केली म्हणून सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे याप्रकरणाचा तपास करत आहेत.