ठाणे – शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी विनय पांडे यांनी शनिवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थान जवळ स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर तेथील पोलिसांनी त्यांना तात्काळ थांबवून त्याची समजूत काढली आहे. एका आंदोलनामध्ये सहभागी झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होता. त्यामुळे त्यांना रिक्षा चालविण्यासाठी बॅच आणि परमिट मिळत नसल्याने त्यांनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

वागळे इस्टेट येथील इंदिरानगर भागात विनय पांडे हे राहतात. ते शिंदे गटाचे उत्तर भारतीय सेलचे प्रचारक आहेत. शनिवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नितीन कंपनी येथील शुभ दिप या निवासस्थान जवळ ते आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. दरम्यान प्रवेशद्वारावर असलेल्या पोलिसांनी तात्काळ त्यांना अडविले. त्यानंतर त्यांना वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात आणून त्यांची समजूत काढण्यात आली.

हेही वाचा – VIDEO : अयोध्या पौळ यांच्यावरील शाईफेक आणि मारहाणीवर केदार दिघे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “षडयंत्र रचून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विनय पांडे यांच्या विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. गेल्या काही दिवसांपासून ते रिक्षाच्या बॅच आणि परमिटसाठी अर्ज करत आहेत. पण त्यांचा अर्ज नामंजूर होत आहे. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने पांडे यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी विनय पांडे यांची समजूत काढली असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.