लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: शहरात झालेल्या पहिल्या पावसादरम्यान एका विद्युत खांबातून प्रवाहित होणाऱ्या वीजेचा धक्का लागून भटक्या श्वानाचा मृत्यु झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर टिका होऊ लागताच ठाणे महापालिकेच्या विद्युत विभागाने चौकशी करून वीजेच्या धक्क्यामुळे श्वानाचा मृत्यु झाला नसल्याचा दावा केला आहे. यामुळे श्वानाचा मृत्यु नेमका कशामुळे झाला, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात मंगळवार सायंकाळपासून पाऊस पडण्यास सुरूवात झाली. रात्री उशीरा पावसाचा जोर वाढला होता. याचदरम्यान कळवा येथील कावेरी सेतू भागातील एस. व्ही.पी. एम शाळेच्या मागे असलेल्या विद्युत खांबाजवळ एक भटका श्वान मृतावस्थेत पडल्याचे समोर आले होते. या श्वानाचा विद्युत खांबातून प्रवाहित होणाऱ्या वीजेचा धक्का लागून मृत्यु झाल्याचे दावे स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत असून यासंबंधीची तक्रार ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे दाखल झाली होती.

हेही वाचा… डोंबिवलीतील पोलीस अधिकारी शेखर बागडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या परिसराचा विद्युत पुरवठा खंडीत करून दुरुस्तीचे काम सकाळी हाती घेण्यात येणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटले होते. या घटनेनंतर पालिकेच्या कारभारावर टिका होऊ लागली होती. या टिकेनंतर ठाणे महापालिकेच्या विद्युत विभागाने विद्युत खांबाची तपासणी केली. या खांबातून विद्युत प्रवाह होत आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली असून यामध्ये खांबाला विजेचा धक्का लागत नसल्याचे समोर आल्याचा दावा विद्युत विभागाने केला आहे. त्यामुळे श्वानाचा वीजेच्या धक्क्यामुळे मृत्यु झालेला नसून श्वानाच्या मृत्युचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.