ठाणे : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दुप्पट नफा मिळेल अशी बतावणी करुन ठाण्यातील एका तरुणाची १२ लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क), ६६(ड) आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम ३ (५) आणि ३१८ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

फसवणूक झालेला तरुण शिवाईनगर भागात राहतो. सुमारे तीन महिन्यांपूर्वी त्याच्या व्हाॅट्सॲप क्रमांकावर शेअर बाजार गुंतणूकीसंदर्भातील एक संदेश प्राप्त झाला होता.

संदेश तपासल्यानंतर त्या तरुणाला एका व्हाॅट्सॲप समूहात सामाविष्ट करण्यात आले. शेअर बाजारात ट्रेडिंगच्या माध्यमातून चांगला नफा मिळू शकेल अशी बतावणी त्या व्हाॅट्सॲप समूहातील एका महिलेने केली.

त्यामुळे तरुणाने ऑनलाईनरित्या त्याच्या बँक खात्यातील १२ लाख ९४ हजार ९९८ रुपये टप्प्या टप्प्याने त्या महिलेने दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यात पाठविले. या गुंतवणूकीच्या मोबदल्यात ३१ लाख रुपये नफा झाल्याचे दिसत होते. तरुणाने नफा बँक खात्यात वळते करण्याचा प्रयत्न केला असता पैसे वळते होत नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी त्याने वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे गु्नहा दाखल जाला आहे.