डोंबिवली : पूर्वी झालेले भांडण मिटविण्यासाठी तरूणांच्या एका टोळक्याने मानपाडा गावातील एका व्यावसायिक तरूणाला सागाव हनुमान मंदिर भागात बोलविले. हा तरूण आल्यावर त्याच्याशी जुना वाद उकरून काढून भांडण मिटविण्याऐवजी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाण प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पवन विश्वास ठाकुर (२५) असे तक्रारदार तरूणाचे नाव आहे. तो ध्वनीक्षेपक यंत्रणेचा व्यवसाय करतात. तो मानपाडा उंबार्ली रस्त्यावरील विद्यानिकेतन शाळे समोरील भागात कुटुंबीयांसह राहतो. पवन ठाकुरच्या तक्रारीवरून पोलिसांनी कार्तिक मांढरे, हरेष म्हात्रे, विशाल देवकर यांच्या विरूध्द मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व मारहाण करणारे तरूण सागावमधील निवासी आहेत.

सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान मानपाडा रस्त्यावरील सागाव येथील हनुमान मंदिरच्या पाठीमागील भागात हा मारहाणीचा प्रकार घडला आहे. दिवसेंदिवस सागाव परिसरात हाणामाऱ्या, गुंडागर्दीचे प्रकार वाढत असल्याने स्थानिक रहिवासी याविषयी त्रस्त आहेत. पोलिसांनी या भागात पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांची आहे. पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहितीनुसार, पवन ठाकुर याचा मित्र विशाल जाधव आणि इतरांचे काही कारणांवर दोन दिवसापूर्वी भांडण झाले होते. या वादाची धुसफूस दोन्ही गटात होती. हा वाद पुन्हा होऊ नये आणि हा विषय वेळीच मिटवून टाकू म्हणून पवन ठाकुर याला कार्तिक मांढरे याने संपर्क करून भेटण्याची मागणी केली.

स्वताहून संपर्क केल्याने पवन ठाकुर आणि त्याचा सहकारी सोमनाथ मोरे हे कार्तिक याने सांगितल्याप्रमाणे रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान सागाव येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागील भागात गेले. तेथे वादावादी होईल असे त्यांना वाटले नाही. हरेष म्हात्रे यांच्या बंगल्यासमोरील भागात पवन ठाकुर आणि सोमनाथ मोरे आल्यावर त्यांना गाफील ठेऊन, चर्चा न करता, जुने भांडण न मिटवता गुन्हा दाखल तरूणांनी त्यांना मारहाण केली.

पवन यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. त्यांच्या पोटाला मारहाणीत जोरदार फटका बसला. पवन ठाकुर याचा या प्रकरणाशी काही संबंध नसताना टोळक्याने त्यालाही मारहाण केली. तेही या मारहाणीत जखमी झाले. जुना वाद मिटवण्यासाठी बोलावून तो विषय मार्गी लावण्याऐवजी मारहाण करणाऱ्या टोळक्याने नवीन विषय वाद निर्माण केला. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने पवन ठाकुर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुंभार याप्रकरणाचा तपास करत आहेत.