ठाणे: आपल्याकडे पाहून हसत असल्याच्या संशयातून तीन महिलांनी एका तरूणीला मारहाण करत डोके जमीनीवर आपटून तिची हत्या केली. मुक्ता कळशे (२२) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात रेणुका बोंद्रे, अंजना रायपुरे आणि लक्ष्मी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळवा येथील जयभीम नगर परिसरात मुक्ता कळशे ही आई आणि भाऊ सचिन यांच्यासोबत राहत होती. काही वर्षांपूर्वी मुक्ताचा भाऊ राहुल याच्यासोबत रेणुका हिचा विवाह झाला होता. परंतु राहुलचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यामुळे रेणुका हिने परिसरातील एका व्यक्तीसोबत विवाह केला. त्यामुळे मुक्ताच्या कुटुंबियांनी रेणुकासोबत कोणताही संपर्क ठेवला नव्हता. मुक्ता हिची विवाहित बहिण दिवाळी निमित्ताने मुक्ताच्या घरी आली होती. त्यामुळे मुक्ता आणि तिची बहिण या दोघी २३ नोव्हेंबरला पाणी पुरी खाण्यासाठी परिसरात गेल्या होत्या. त्या गप्पा मारत असताना रेणुका तेथून पायी जात होती. त्यावेळी रेणुका हिला त्या दोघी आपल्याकडे पाहून हसत असल्याचा संशय आला. रेणुकाने तेथे जाऊन माझ्याकडे पाहून का हसत असा प्रश्न करत शिवीगाळ केली.

हेही वाचा… आता ‘धर्मवीर २’, एकनाथ शिंदेंच्या पुढील वाटचालीवर आधारित चित्रपट?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुक्ताने तिला समजाविण्याचा प्रयत्न केला. तसेच माफी मागते असेही सांगितले. परंतु रेणुकाने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. शनिवारी सकाळी मुक्ता सार्वजनिक स्वच्छतागृहात गेली असता, रेणुका आणि तिच्या बहिणी अंजना, लक्ष्मी त्याठिकाणी आल्या. त्यांनी मुक्ता हिला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. याबाबत मुक्ताच्या आईला याबाबत माहिती मिळाली असता, त्यांनी तात्काळ तेथे धाव घेतली. मारहाण करू नका अशी विनवणी त्या करत होत्या. परंतु महिलांनी मुक्ता हिला मारहाण सुरूच ठेवली. त्यानंतर लक्ष्मीने मुक्ताचे केस पकडून तिचे डोके जमीनीवर आपटले. त्यानंतर त्यांनी मुक्ता यांच्या आईला देखील मारहाण केली. मुक्ता गंभीर जखमी असताना तिने पोलिसांना संपर्क साधला. तसेच कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुक्ता हिला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना तिची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.